लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर

More Than 100 Killed In Fire At Wedding: लग्नसमारंभादरम्यान लागलेल्या या आगीमध्ये 150 हून अधिक वऱ्हाडी जखमीही झाले आहेत. या दुर्घटनेनंतर सरकारने मदतकार्य सुरु केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 27, 2023, 08:18 AM IST
लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर title=
या लग्नसमारंभातील काही व्हिडीओही समोर आले आहेत.

More Than 100 Killed In Fire At Wedding: इराकमधील नीनवे प्रांतातील हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (26 सप्टेंबर 2023) रात्री झालेल्या एका भीषण अपघातामध्ये शेकडो जण मृत्यूमुखी पडले आहेत. येथील एका लग्नसमारंभादरम्यान भीषण आग (Iraq Wedding Fire) लागल्याने 100 वऱ्हाड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 150 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नववधू-वराचाही समावेश आहे. इराकमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी बुधवारी पहाटे दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखीन वाढू शकतो अशी शक्यता स्थानिक सूत्रांनी व्यक्त केली आहे. लग्नानंतर फटाक्यांची आतिशबाजी केली जात असतानाच लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेल्या हॉललाच आग लागली. या हॉलमध्ये शेकडोच्या संख्येनं असलेल्या पाहुण्यांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही.

आग कशी लागली?

सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हा हॉल आणि इमारत अत्यंत ज्वलनशील पदार्थांपासून बनवण्यात आली होती. त्यामुळेच आगीचा भडका उडल्यानंतर ती फार वेगाने पसरली. आग नियंत्रणात आणण्याची संधीच यंत्रणांना मिळाली नाही असंही सांगितलं जातं. इराकमधील नारिक सुरक्षा विभागाने यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, लग्नानंतर वाजवण्यात आलेल्या फटक्यांमुळे ही आग लागली. राजधानीचं शहर असलेल्या बगदादपासून उत्तरेला 400 किलोमीटर दूरवरील मोसूल शहरांमध्ये हा भीषण अपघात घडला. ज्या ठिकाणी अपघात घडला तो मोसूलमधील सर्वात मोठ्या हॉलपैकी एक आहे.

लग्नात आग लागल्यानंतर हॉलच्या छप्पराचा भाग आगीच्या गोळ्यांप्रमाणे कोसळल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. आगीच्या घटनेनंतरचे फोटो आणि अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

1)

2)

...म्हणून पसरली आग

इराकमधील नीनी या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, इमारतीचं बांधकाम करताना निकृष्ट दर्जाचं सामन वापरण्यात आलं असल्याने आग काही मिनिटांमध्ये पसरल्याचा दावा नागरिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याने केला आहे. रॉयटर्सच्या एका पत्रकाराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये या आगीमध्ये अडकलेल्या मात्र मदतीसाठी हाक मारत असलेल्यांना वाचवण्यासाठी अग्नीशामन दलाचा एक जवान कोसळलेल्या हॉलच्या ढीगाऱ्यात लोकांची शोध घेत असल्याचं दिसत आहे. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांनी या या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमी झालेल्यांना तातडीने मदत करण्याचे आदेश दिले आहेत. 

प्रत्यक्षदर्शी सांगतात आग लागली तेव्हा...

अधिकृत सरकारी माहितीनुसार, इराकमधील सरकारी अधिकाऱ्यांनी इराकमधील अर्ध-स्वायत्त कुर्दिस्तान क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी रवाना केल्या आहेत. वेगवगेळ्या भागांमधून मदत करण्यासाठी मेडिकल टीम्सही मोसूलमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 10 वाजून 45 मिनिटांनी आग लागल्याची घटना घडली. ज्यावेळेस आग लागली त्यावेळी हॉलमध्ये शेकडो लोक उपस्थित होते असंही उपस्थितांनी सांगितलं.