Sunita Williams' husband and mother on her extended stay in space : भारतीय वंशाच्या आणि नासासाठी कार्यरत असणाऱ्या अंतराळवीर सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर 5 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर अर्थात International Space Station वर पोहोचले. पण, त्यांच्या बोईंग स्टारलायनर या यानामध्ये परतीच्या प्रवासाआधीच काही तांत्रिक अडचणी उदभवल्यामुळं ही मोहीम आणखी लांबली. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या माहितीनुसार विलियम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 पर्यंत अवकाशात राहणार असून, त्यांच्या परतीसाठी एलॉन मस्कच्या स्पेसएक्सकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
NASA कडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार स्टारलायनर या दोन्ही अंतराळवीरांशिवाय पृथ्वीवर परतणार असून, या दोघांनाही फेब्रुवारीमध्ये SpaceX च्या कॅप्स्युलनं पृथ्वीर माघारी आणलं जाणार आहे. एकिकडे संपूर्ण जगाचं लक्ष या मोहिमेनं वेधलेलं असतानाच आता सुनिता विलियम्स यांच्या कुटुंबाची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांचे पती आणि आई यांचं या सर्व घडामोडींवर नेमकं मत काय हे आता समोर आलं आहे.
सुनिता विलियम्स यांचे पती मायकल विलियम्स आणि त्यांची आई, बोनी पांड्या यांना त्यांच्या या मोहिमेत कोणताही धोका दिसत नसून, सुनिता यांचा अंतराळातील मुक्काम वाढल्याप्रकरणी त्यांना धास्ती नसल्याचं स्पष्ट होत आहे. यामागचं कारण म्हणजे नासावर असणारा त्यांचा विश्वास.
'ती तिची आनंदी जागा आहे', असं मायकल विलियम्स यांनी 'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. दरम्यान, आपल्या मुलीचा अंतराळातील मुक्काम वाढल्या प्रकरणी बोनी पांड्या यांनीही फारसा चिंतेचा सूर आळवलेला नाही. विल्मोर आणि सुनिता हे दोघंही अंतराळात त्यांची सर्वोत्तम कामगिरी बजावत असल्याचं त्या म्हणाल्या.
'मी तिला काहीही सल्ला देत नाही. नेमकं काय करायचं आहे हे तिला माहितीये. ती एक seasoned astronaut आहे. विसरू नका, ती 400 दिवस अंतराळात राहून आलिये. त्यामुळं सर्वकाही चांगलं होणार आहे' असं सुनिता विलियम्स यांच्या आईनं म्हटलं. विलियम्स यांची आई आणि पती या दोघांनीही त्यांच्या या मोहिमेप्रती दाखवलेला विश्वास पाहता एका अर्थी त्यांनीच विलियम्स यांची काळजी करणांना धीर दिला असं म्हणायला हरकत नाही.