श्रीलंकेमागोमाग भारताशेजारील 'हा' देश आर्थिक संकटात, आता पुढचा नंबर कुणाचा

भारताशेजारील आणखी एका देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. केंद्रीय बँकेने वाहने आणि कोणत्याही महागड्या किंवा चैनीच्या वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.

Updated: Apr 11, 2022, 11:28 AM IST
श्रीलंकेमागोमाग भारताशेजारील 'हा' देश आर्थिक संकटात, आता पुढचा नंबर कुणाचा  title=
प्रतिकात्मक फोटो

नवी दिल्ली : नेपाळच्या सेंट्रल बँकेने एक मोठी घोषणा केली आहे. सेंट्रल बँकेने वाहने आणि कोणत्याही महागड्या किंवा लक्झरी वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये रोख रकमेच्या तुटवड्याबरोबरच परकीय चलनाच्या गंगाजळीतही घट झाली आहे. यामुळे बँकेला हा मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. नेपाळची मध्यवर्ती बँक 'नेपाळ राष्ट्र बँक' (NRB) ने गेल्या आठवड्यात अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठकीनंतर या सूचना जारी केल्या.

या घोषणेनंतर, NRB चे प्रवक्ते गुणाखर भट्ट म्हणाले की, 'आयात वाढल्यामुळे, आमच्या अर्थव्यवस्थेवर संकट येण्याचे चिन्हं आहेत. त्यामुळे ज्या वस्तूंची गरज नाही अशा वस्तूंची आयात त्वरित थांबवण्याचा विचार करत आहोत'.

परकीय चलन साठ्यात घट

श्रीलंकेप्रमाणे नेपाळची आर्थिक स्थिती देखील खालावत चालली आहे. आयात वाढणे, पर्यटन आणि निर्यातीतून उत्पन्नाचा अभाव यामुळे जुलै 2021 पासून नेपाळमध्ये परकीय चलनाचा साठा कमी होत आहे.

सेंट्रल बँकेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशाचा एकूण परकीय चलन साठा फेब्रुवारी 2022 पर्यंत 17 टक्क्यांनी घसरून $9.75 अब्ज झाला आहे. जो जुलै 2021 च्या मध्यापर्यंत $11.75 अब्ज होता. परंतू देशात श्रीलंकेसारखी परिस्थिती नसल्याचे नेपाळचे अर्थमंत्री जनार्दन शर्मा यांनी म्हटलं आहे.