Dawood Ibrahim rules Karachi airport: कराची विमानतळ दाऊदच्या नियंत्रणात, NIA चा मोठा खुलासा

पाकिस्तानमधील कराची विमानतळ भारतातील मोस्ट वॉण्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या नियंत्रणात असून डी-कंपनीच्या सदस्यांना तिथे कोणतीही अडवणूक होत नाही असा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे  

Updated: Jan 19, 2023, 01:10 PM IST
Dawood Ibrahim rules Karachi airport: कराची विमानतळ दाऊदच्या नियंत्रणात, NIA चा मोठा खुलासा title=
कराची विमानतळावर डी-कंपनीच्या सदस्यांना विशेष वागणूक

पाकिस्तानमधील कराची विमानतळ (Karachi Airport) भारतातील मोस्ट वॉण्टेड गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) नियंत्रणात असल्याचा खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) केला आहे. विमानतळावर डी-कंपनीच्या सदस्यांना कोणतीही अडवणूक केली जात नसल्याचंही एनआयएने सांगितलं आहे. एनआयए सध्या डी-कंपनीचे ऑपरेटिव्ह आणि साथीदारांची चौकशी करत आहेत. या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, कराची विमानतळावर डी-कंपनीच्या सदस्यांना चेक-इन, चेक-आऊटदरम्यान विशेष वागणूक दिली जाते. इतकंच नाही तर त्यांनी इमिग्रेशन काऊंटवर जात सुरक्षेचे नियमही पाळावे लागत नाहीत. 

दाऊद, छोटा शकीलच्या दहशतवाद्यांना विमानतळावर विशेष वागणूक

दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा सहभाग असणाऱ्या दहशतवाद निधी प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे. यादरम्यान त्यांना कराची विमानतळावर डी-कंपनीच्या सदस्यांना विशेष वागणूक मिळत असल्याची माहिती मिळाली. 

दाऊद इब्राहिम किंवा छोटा शकीलला व्यवसाय तसंच इतर कारणांसाठी भेटण्याकरिता येणाऱ्या डी-कंपनीच्या सदस्यांना विमानतळावर रोखलं जात नाही. त्यांच्यासाठी सुरक्षेचे कोणतेही नियम ठेवण्यात आलेले नाहीत अशी माहिती एनआयएने दिली आहे. व्हीआयपी कक्षेतही त्यांना थेट प्रवेश मिळतो.

दाऊदचं दुसरं लग्न

दाऊजने दुसरं लग्न केलं असून पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्याची खोटी बतावणी केल्याची माहितीही एनआयएने दिली आहे. दाऊदची बहिण हसीना पारकर हिच्या मुलाने म्हणजेच दाऊदचा भाचा अलीशाह याने एनआयएला ही माहिती दिली. दाऊदच्या पहिल्या पत्नीनेच हे सांगितलं असल्याचं त्याचा दावा आहे. दाऊदची दुसरी पत्नी पाकिस्तानच्या एका पठाण कुटुंबाशी संबंधित आहे.

"दाऊदच्या पत्नीचं नाव मैजबीन असून त्याला तीन मुली आणि एक मुलगा आहे. मारुख, मेहरीन आणि माझिया अशी मुलींची नावं आहेत. तर मुलाचं नाव मोहीन नवाज आहे," अशी माहिती अलीशाहने दिली आहे. मारुखचं लग्न पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार जावेद मियाँदाद यांच्याशी झाला आहे.