चिनी सैन्यांच्या हालचालींवर भारताची नजर, सीमेवर सैन्यांची संख्या दुप्पट

भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे.

Updated: Jun 28, 2020, 06:41 PM IST
चिनी सैन्यांच्या हालचालींवर भारताची नजर, सीमेवर सैन्यांची संख्या दुप्पट

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने लडाखमध्ये आपले सैन्य वाढवलं आहे. मागील काही महिन्यांत पूर्व लडाखच्या अनेक भागात सैन्य तैनात केले गेले आहे. भारताला हे पाऊल उचलावे लागले कारण चीनी सैन्य या भागातील खरी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरक्षा एजन्सींच्या वेगवेगळ्या आढाव्यांमध्ये हे उघड झाले आहे.

सैन्याने संपूर्ण लडाख भागात 40 ते 45 हजार सैनिक तैनात केले आहेत. पूर्वी ही संख्या 20 ते 24 हजार असायची. याशिवाय भारतीय भू-संरक्षणामध्ये इंडो-तिबेट सीमा पोलिसांची (आयटीबीपी) उपस्थिती देखील वाढविण्यात आली आहे. पण सध्या चिनी सैनिकांची संख्या भारतापेक्षा कमी आहे. भारताच्या तुलनेत येथे सुमारे 30 ते 35 हजार सैन्य आहे.

चीनने चुमार, देप्सांग, डेमचॉक, गोरगा, गलवान, पेंगाँग झील, ट्रिग हाइट्स अशा अनेक भागातील स्थिती बदलण्याचा विचार करत आहे. हे लक्षात घेता भारताने त्याला उत्तर देण्याची तयारी केली आहे. भारतीय सैन्याने हवाई मार्गावर देखील पाळत तीव्र केली आहे. मेच्या अखेरीस चीनने मोठ्या प्रमाणात सीमेजवळ रणगाडे आणि शस्त्रे जमा करण्याच्या कामात मोठ्या प्रमाणात गती आणली होती. याआधीही चिनी सैन्य तिथे हजर होते. त्याच्याबरोबर, चीनने अधिक लढाऊ सैन्यांची तैनाती वाढविली.

मेच्या सुरुवातीला चिनी आक्रमण सुरू झाले. चिनी सैन्याने वारंवार भारतीय सैन्याला या भागात गस्त घालण्यापासून रोखले. याचा परिणाम म्हणून पेट्रोलिंग पॉईंटवर (पीपी 14) दोन्ही सैन्यात चकमक झाली. दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर आले. 15 जून रोजी ही गोष्ट इतकी गंभीर झाली की भारताचे 20 सैनिक शहीद झाले. तर अनेक चिनी सैनिकांचा देखील मृत्यू झाला. परंतु त्यांनी अधिकृतपणे याची घोषणा केलेली नाही.

चिनी सैन्याने पेंगाँग सरोवराच्या उत्तर टोकाला सैन्य वाढवलं आहे. फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यानच्या चीनी सैनिकांची संख्या 1 हजार ते दीड हजारांच्या आसपास आहे. चिनी सैनिकांनी फिंगर 4 ते 8 दरम्यान बंकर आणि पोस्ट तयार केल्या आहेत. जे वास्तविक परिस्थितीचे स्पष्ट उल्लंघन आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी पेंगाँग सरोवराजवळची परिस्थिती सामान्य असणे आवश्यक असल्याचे जानकरांचं म्हणणं आहे.