नवी दिल्ली : नेपाळ-भारत दरम्यान सीमा वादावरुन सुरु असलेला संघर्ष काहीसा निवळताना दिसत आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना फोन केल्यानंतर आता भारताकडून त्यांच्याशी बातचीत सुरु होण्याची शक्यता आहे. काठमांडूमध्ये 17 ऑगस्ट रोजी होणारी बैठक नेपाळमध्ये भारताद्वारे चालवण्यात येणाऱ्या विकास प्रकल्पांवर आधारित असल्याची माहिती आहे.
भारतात उत्तराखंडतील कालापानी, लिपुलेख आणि लिम्प्युधाराला आपल्या नकाशात दर्शवल्यानंतर नेपाळ-भारतादरम्यान सीमावाद सुरु आहे. केपी शर्मा ओली यांनी नेपाळमध्ये कोरोना भारतामुळे पसरला असून खरी अयोध्या नेपाळमध्ये असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतरही नेपाळ-भारत संबंधांबाबत अनेक चर्चा होत्या.
मात्र 15 ऑगस्ट रोजी केपी शर्मा ओली यांनी, पंतप्रधान मोदींना फोन करुन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यानंतर दोन्ही देशातील वाद काहीसा निवळत असल्याचं चित्र आहे. ओली यांनी मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छांसह सुरक्षा परिषदेतील सदस्यत्वाबाबतही भारताला शुभेच्छा दिल्या. जवळपास 10 मिनिटं झालेल्या बातचीतनंतर दोन्ही देशांनी नेपाळमध्ये बातचीत होण्याची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, काठमांडूमध्ये होणाऱ्या या बैठकीत भारताचे राजदूत विनय मोहन क्वात्रा आणि नेपाळचे परदेश सचिव शंकर दास बैरागी हेदेखील सहभागी होणार आहेत. या बैठकीत नेपाळमध्ये भारताकडून चालवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या प्रगतीवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.