लाहोर: देशाची अर्थव्यवस्था खंगल्यामुळे आता पाकिस्तानी लष्करावर इजिप्तने भंगारात काढलेली विमाने विकत घ्यायची वेळ आली आहे. पाकिस्तान आणि इजिप्तमध्ये सध्या ३६ दसॉल्ट मिराज-V विमानांच्या खरेदी व्यवहाराविषयी चर्चा सुरु आहे. इजिप्तच्या हवाई दलातून नुकतीच ही विमाने निवृत्त झाली आहेत. मात्र, पाकिस्तान या विमानांमध्ये सुधारणा करून ती स्वत:च्या ताफ्यात दाखल करून घेणार आहे.
तुलना करायची झाल्यास मिराज-V विमाने भारतीय वायूदलातील मिराज-२००० विमानांच्या आसपासही नाहीत. भारताच्या मिराज-२००० विमानांनीच फेब्रुवारी महिन्यात बालाकोट परिसरात एअर स्ट्राईक केला होता. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव प्रचंड वाढला होता. या पार्श्वभूमीवर भारतीय वायूदलाच्या ताफ्यात लवकरच फ्रेंच बनावटीची अत्याधुनिक अशी राफेल विमाने दाखल होणार आहेत.
सध्याच्या घडीला राफेल हे जगातील सर्वाधिक अत्याधुनिक आणि बहुपयोगी लढाऊ विमानांपैकी एक आहे. लवकरच भारतीय वायूदलाच्या ताफ्यात पहिले राफेल विमान दाखल होईल.
राफेल विमान नेमकं आहे तरी कसं?
त्यामुळे आता पाकिस्ताननेही आपले वायूदल सुसज्ज करण्यासाठी इजिप्तकडून मिराज-V विमाने विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडे सध्या ९२ मिराज-V, ८७ मिराज-३ आणि काही एफ-१६ विमाने आहेत. याशिवाय, पाककडे चेंगडू जे-७ आणि जेएफ-१७ ही विमानेही आहेत.
पाकिस्तान इजिप्तकडून विकत घेणार असलेल्या मिराज-V विमानांमध्ये रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. त्यासाठी इजिप्त सरकारशी पाकची बोलणी सुरु आहेत. मात्र, ही विमाने आता कालबाह्य होण्याचा मार्गावर आहेत. दसॉल्ट कंपनीनेही या विमानांचे उत्पादन बंद केले होते. त्यामुळे भारतीय वायूदलासमोर ही विमाने कितपत टिकाव धरू शकतील, याबाबत साशंकताच आहे.