इस्लामाबाद : पाकिस्तानी टेलिव्हिजन वाहिन्यांवर भारतीय कार्यक्रमांचं प्रसारण बंद करण्यात येणार असल्याचं पाकिस्तानचे सरन्यायाधीश साकिब निसार यांनी बुधवारी जाहीर केलं. भारतीय कार्यक्रम हे पाकिस्तानी संस्कृतीसाठी घातक असल्याचही त्यांनी हा निर्णय देत स्पष्ट केलं.
'पर्मा' म्हणजेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक रेग्लुलेटरी ऑथॉरिटीने दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात ही सुनावणी केल्याचं वृत्त 'डॉन'ने प्रसिद्ध केलं आहे.
पर्माच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सलीम बेग यांनी सांगितल्यानुसार 'फिल्मजिया' या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांपैकी ६५ टक्के कार्यक्रम किंबहुना ८० टक्के कार्यक्रम हे बाहेरच्या देशांतील असतात.
सरन्यायाधीशांनी भारतीय कार्यक्रम प्रसारित न होऊ देण्याची बाब स्पष्ट केली. तर, पर्माच्या वकिलांनी त्यांना उत्तर देत, 'फिल्मजिया ही वृत्तवाहिनी नसून, ती एक मनोरंजनात्मक वाहिनी आहे. तो कोणत्याच गोष्टीला प्रोत्साहन देत नाही' हा मुद्दा अधोरेखित केला. पण, तरीही हे असे कार्यक्रम आपल्या (पाकिस्तानी) संस्कृतीसाठी धोक्याचे असल्याच्याच मतावर सरन्यायाधीश ठाम होते.
या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता संबंधित प्रकरणाची अंतिम सुनावणी ही फेब्रुवारी महिन्यात करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, एकंदरच या निर्णयाची हवा आणि भारतीय कार्यक्रमांसाठी पाकिस्तानमधी वातावरण पाहता येत्या काळात शेजारी राष्ट्रात भारतीय वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात येण्याची चिन्हं आहेत.