close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

LIVE टीव्ही कार्यक्रमात सत्ताधारी नेता आणि पत्रकाराची हाणामारी व्हायरल

एक राजकीय नेता आणि पत्रकार यांच्यात अशी हाणामारी पाकिस्तानच नव्हे तर संपूर्ण जगानं पहिल्यांदाच पाहिली असावी

Updated: Jun 25, 2019, 04:52 PM IST
LIVE टीव्ही कार्यक्रमात सत्ताधारी नेता आणि पत्रकाराची हाणामारी व्हायरल

नवी दिल्ली : दोन राजकीय नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य आणि शाब्दिक मार भारतीयांना काही नाही. परंतु, पाकिस्तानात मात्र काहीसा वेगळा प्रकार पाहायला मिळाला. यामध्ये एका लाईव्ह चर्चात्मक कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाचे एक नेते लाईव्ह कार्यक्रमादरम्यानच हाणामारीवर उतरले. 'के २१ न्यूज' नावाच्या चॅनलवर 'न्यूज लाईन विद आफताब मुघेरी' या कार्यक्रमानं प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. या कार्यक्रमाच्या पॅनलमध्ये सत्ताधारी पीटीआय पक्षाचे नेते मसरूर अली सियाल आणि कराची प्रेस क्लबचे प्रमुख आणि पत्रकार इम्तियाज खान यांचाही समावेश होता. दोघांमध्येही तिखट संभाषण सुरू झालं आणि पाहता पाहता दोघांतला शाब्दिक वाद हाणामारीवर कधी पोहचला हे कळलंच नाही. यामुळे इतर उपस्थितही गोंधळले.

एक राजकीय नेता आणि पत्रकार यांच्यात अशी हाणामारी पाकिस्तानच नव्हे तर संपूर्ण जगानं पहिल्यांदाच पाहिली असावी. संतापलेले पीटीआय नेते आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी पत्रकाराला धक्का देऊन त्यांना खाली पाडलं. त्यानंतर नेत्यानं पत्रकाराला कॅमेऱ्यासमोरच हाणामारी सुरू केली. दोघांनाही इतर उपस्थित पाहुण्यांनी आणि सेटवर उपस्थित असणाऱ्या टीव्हीच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांपासून वेगळं केलं. या घटनेनंतर पीटीआयवर सर्वच स्तरांतून टीका होतेय.