चर्चेला पुन्हा सुरुवात व्हावी, पाक पंतप्रधान इमरान खान यांचं मोदींना पत्र

यापूर्वी, पंतप्रधान मोदींनीही इमरान खान यांच्या फोनवर विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या

Updated: Sep 20, 2018, 08:53 AM IST
चर्चेला पुन्हा सुरुवात व्हावी, पाक पंतप्रधान इमरान खान यांचं मोदींना पत्र title=

नवी दिल्ली : पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान दरम्यान नव्यानं चर्चेला सुरुवात करण्याची इच्छा व्यक्त केलीय. यासाठीच इमरान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रंही लिहिलंय. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीसोबतच भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात एक बैठक व्हावी, अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केलीय. येत्या महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेम्ब्लीची बैठक होणार आहे. 

पंतप्रधान मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांदरम्यान नव्यानं संबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. याच्या उत्तरादाखल इमरान खान यांनी पंतप्रधानांना हे पत्र लिहिलंय.

भारत एक पाऊल पुढे आलं तर आपण दोन पाऊल पुढे येऊ, असं इमरान खान यांनी आपल्या निवडणुकीतील विजयानंतर म्हटलं होतं. 

'टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, इमरान खान यांनी या पत्राद्वारे भारताशी चर्चा सुरू करण्याचा औपचारिक प्रस्ताव मांडलाय. या पत्रात पाकिस्ताननं 2015 मध्ये सुरू झालेल्या द्विपक्षीय चर्चेचा सिलसिला पुन्हा एकदा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडलाय. या चर्चेदरम्यान दहशतवाद आणि काश्मीर संबंधित प्रश्नांवर भारत-पाकिस्ताननं तोडगा काढावा, असं म्हटलं गेलंय. 

यापूर्वी, पंतप्रधान मोदींनीही इमरान खान यांच्या फोनवर विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच भेट म्हणून एक क्रिकेट बॅटही पाठवली होती.