जैश-ए-मोहम्मद बद्दल भारतात गैरसमज पसरवले जातायत- पाकिस्तान

पाकिस्तानही जैश ए मोहम्मदला पाठीशी घालताना दिसत आहे.  

Updated: Feb 24, 2019, 01:14 PM IST
जैश-ए-मोहम्मद बद्दल भारतात गैरसमज पसरवले जातायत- पाकिस्तान  title=

नवी दिल्ली : पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान मारले गेले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. जैश ए मोहम्मदचा एक सूत्रधार रशीद गाझी याचा भारतीय जवानांनी खात्मा केला. भारत आणखी जोरदार कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने जैश ए मोहम्मद चे मुख्यालय स्वत:च्या नियंत्रणाखाली घेतले आहे. जैश-ए-मोहम्मदला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात भारताचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण चीन आपल्या विरोध मताचा अधिकार वापरून यात खोडा करत आहे. पाकिस्तानही जैश ए मोहम्मदला पाठीशी घालताना दिसत आहे.  

Image result for pakistan and jaish e mohammad zee

आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाकिस्तानवर चौफेर टीका होऊ लागली आहे. मात्र त्यानंतरही पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची पाठराखण केलीये.. जैश-ए-मोहम्मद या संघटनेबाबत भारतात गैरसमज पसरवले जात असल्याचे पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले आहे. ज्या जागेला जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय सांगीतलं जातं ते ठिकाण एक मदरसा असून तिथं मुलांना शिक्षण दिलं जाते. त्यामुळे यासंघटनेचा आणि पाकिस्तानचा पुलवामा हल्ल्याशी कोणताही संबंध नाही असा दावा फवाद चौधरी यांनी केला आहे.

मसूद सुरक्षित 

Image result for masood azhar zee

मसूद अजहर याच संघटनेचा म्होरक्या आहे. भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि पाकिस्तानमधील तरुणांची माथी भडकाविण्याचे काम मसूद अजहर गेल्या काही वर्षांपासून करीत आहे. त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. चीनकडून मात्र याला विरोध होत आहे. पाकिस्तानही मसूद अजहरला पाठीशी घालतना दिसत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने 'जैश ए मोहम्मद' चा म्होरक्य मसूद अजहरला बहावलपूर हेडक्वार्टरमधून हटवून दुसऱ्या ठिकाणी पाठवले आहे. पाकिस्तान सरकारने मसूद अजहरला रावळपिंडीमधील सुरक्षित ठिकाणी हलवल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचे मुख्यालय या ठिकाणी आहेत.

सुरक्षिततेचा इशारा 

भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद येत्या काळात जम्मू आणखी काही आत्मघाती हल्ले घडवण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. गुप्तचर यंत्रणांकडून नुकतच मिळालेल्या माहितीनुसार सध्या 'जैश...' आणखी एक मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारीत आहे. या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, संबंधित धागेदोऱ्यांच्या बळावर आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न गुप्तचर यंत्रणांकडून करण्यात येत आहे.