न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल

न्ययॉर्कमधील भारतीयांनी पाकिस्तान दूतावासाबाहेर एकत्र येत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या.

Updated: Feb 23, 2019, 01:06 PM IST
न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणाबाजी; व्हिडिओ व्हायरल title=

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. भारतात ठीक-ठिकाणी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात येत आहे. भारतासह अमेरिकेतही हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांनी शनिवारी पाकिस्तानच्या वाणिज्य दूतावासासमोर निदर्शने केली. न्ययॉर्कमधील भारतीयांनी पाकिस्तान दूतावासाबाहेर एकत्र येत पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या.

पुलवामा हल्ल्यानंतर जगभरात संतापाची लाट उसळली आहे. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांनी एकत्र येऊन आंदोलन केले. यावेळी पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये संतापलेल्या नागरिकांनी लष्कर ए तोयबा - पाकिस्तान, ग्लोबल टेरर - पाकिस्तान, ९/११ पाकिस्तान, २६/११ पाकिस्तान, ओसामा बिन लादेन - पाकिस्तान अशा घोषणा दिल्या. यापूर्वी १९ फेब्रुवारीला शेकडो अमेरिकी पुलवामा हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अमेरिकेतील विविध शहरांत एकत्रित जमले होते. 

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानामध्ये तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी आपापल्या राजदूतांना पुन्हा बोलवून घेतले आहे. हल्ल्याच्या निषेधार्थ शेकडोंच्या संख्येने भारतीय-अमेरिकी नागरिकांनी रविवारी ९/११ स्मारकाजवळ एकत्रितपणे घोषणा दिल्या तसेच अशाप्रकारचे भ्याड कृत करणाऱ्यांविरोधात उभे राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.