इस्लामाबाद : 'लाल मेरी पत' और 'दाने पे दाना' यांसारखे प्रसिद्ध गीत गाणाऱ्या प्रसिद्ध पाकिस्तानी सूफी गायिका शाजिया खश्क (Shazia Khushk) यांनी शोबिझला 'अलविदा' केलाय. यापुढे आपण गाणं गाणार नाही, असं त्यांनी जाहीर केलंय. पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या माहितीनुसार, गायिका शाजिया यांनी आपण शोबिझ सोडत असल्याचं स्पष्ट केलंय. यापुढे आपलं संपूर्ण आयुष्य इस्लामिक शिक्षणाच्या अनुरुप जगण्याचा निर्णय आपण घेतलाय... आणि माझा निर्णय पक्का आहे. मला आता उरलेलं आयुष्य इस्लामची सेवा करत व्यतीत करायचं आहे, असं शाजिया यांनी म्हटलंय.
आत्तापर्यंत आपल्याला दिलेल्या प्रेमासाठी रसिकांचे त्यांनी आभार मानलेत. आपल्या या निर्णयाचंही रसिक समर्थन करतील, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. काहीही झालं तरी आपण आपल्या निर्णयावरून मागे हटणार नसल्याचं आणि शोबिझमध्ये परतणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सिंधशी निगडीत असणाऱ्या शाजिया यांनी सिंधीसोबतच उर्दु, पंजाबी, बलोची, सराइकी आणि काश्मिरी भाषांमध्येही अनेक गाणी गायलीत. जगभरातील जवळपास ४५ देशांमध्ये त्यांचे कार्यक्रम पार पडलेत. त्यांना सूफी गायिका म्हणून तर ओळखलं जातंच शिवाय त्या सिंधी लोककलाकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी 'दंगल'फेम बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसीम हिनं धर्मासाठी आपण अभिनय क्षेत्रातून बाहेर पडत असल्याचं म्हटलं होतं. २०१६ साली झायरानं आमिर खानसोबत 'दंगल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'सिक्रेट सुपरस्टार'साठीही तिच्या कामाचं खूप कौतुक झालं होतं.