पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर?

सौदीच्या नेत्यांसह द्विपक्षीय चर्चेची शक्यता

Updated: Oct 5, 2019, 10:23 AM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर? title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सौदी अरेबियाचा दौरा करण्याची शक्यता आहे. २ ऑक्टोबर रोजी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. अजीत डोवाल यांचा हा दौरा, पंतप्रधानांच्या सौदी अरेबिया दौऱ्यासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी केला असल्याचे बोलले जात आहे. 

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी सौदी अरेबियामध्ये क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. यावेळी दोघांमध्ये गुंतवणूक, आर्थिक संबंधांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी पंतप्रधान मोदी सौदीच्या नेत्यांसह द्विपक्षीय चर्चाही करु शकतात. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भेटीदरम्यान मोदी राजधानी रियादमध्ये, आखाती देशांद्वारे आयोजित एका गुंतवणूकसंबंधी बैठकीतही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, पंतप्रधानांच्या आगामी सौदी अरेबिया दौऱ्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

२ ऑक्टोबर रोजी अजित डोवाल सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रिन्स सलमान यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवण्याच्या भारताच्या निर्णयासंबंधीत बाबींची चर्चा केली. तसचे दोघांमध्ये राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षेच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. गेल्या महिन्यात सौदी अरेबियाच्या तेल ठिकाणांवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांबाबत आणि सौदी अरेबियाच्या सुरक्षेबाबतही दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली. 

पंतप्रधान मोदींचा हा दुसरा सौदी अरेबिया दौरा ठरु शकतो. याआधी २०१६मध्ये पंतप्रधान मोदी सौदी अरेबिया येथे दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन सन्मानिक करण्यात आले होते.