नवी दिल्ली : पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना तशा नवीन नाहीत. मात्र पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनवा प्रांतात कट्टरपंथीयांनी भव्य मंदिर जमीनदोस्त केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानात हिंदू असणं गुन्हा आहे का? असा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे.
पाकिस्तानात मंदिरावर हल्ला
धार्मिक घोषणा देणारी ही लोकं कोणत्या मोर्चा अथवा रॅलीतली नाहीत. ही उन्मादी लोकांची गर्दी आहे ज्यांनी पाकिस्तानात आग लावली आहे मात्र या आगीत जगभरातल्या कोट्यवधी हिंदूच्या आस्था जळून खाक झाल्या आहेत.
Today in Naya Pakistan: Hindu temple set ablaze and razed to the ground by a charged mob led by clerics in Karak, Khyber Pakhtunkhwa. pic.twitter.com/6v1mkXnqgB
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) December 30, 2020
पाकिस्तानतल्या पख्तूनवाह प्रांतात घडलेला हा प्रकार आहे. कोहाटमधल्या करक जिल्ह्यात कट्टरपंथीयांनी थोट एका मंदिराला आग लावली. कट्टरपंथीयांच्या या मोठ्या जमावानं आधी मंदिरात जाऊन तोडफोड केली. भींती जमीनदोस्त केल्या. दरवाजे तोडले. त्यानंतर थेट मंदिराला पेटवून दिलं. ही दृश्य पाहून तुम्ही कल्पना करू शकतात की या उन्मादी जमावानं कीती नासधूस केली असेल ती. सूर्याच्या लख्ख प्रकाशात हा हाहाकार अनेक तास सुरू होता. मात्र प्रशासनानं केवळ बघ्याची भूमिका घेतली आणि धार्मिक आस्थांना काळिमा फासणाऱ्या या घटनेचे ते केवळ साक्षीदार बनून राहिले. या मंदिराच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली पोलीस चौकीही या कट्टरपथींयांनी जमीनदोस्त केली.
खैबर पख्तूनवाहच्या टेरी गावात हिंदू संत श्री परमबहंस महाराजांची ही समाधी आहे. या भागातलं हे हिंदूंच्या आस्थेचं स्थान आहे. 1919 मध्ये या ठिकाणी संत परमहंस महाराजांनी समाधी घेतली होती. तेव्हापासून हिंदू भाविक या ठिकाणी पूजापाठ करण्यासाठी येत असतात. मात्र 1997 मध्ये एका स्थानिक मौलवीनं हे समाधीस्थळ उद्धवस्त करून या मंदिरावर ताबा घेतला. त्यानंतर हिंदूंनी या मंदिराच्या पुनर्निमाणसाठी कोर्टात संघर्ष केला. 2015 मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टानं मंदिराच्या जीर्णोद्धार आणि विस्ताराची परवानगी दिली. त्यानंतर या मंदिराच्या उभारणीचं काम सुरू झालं.
पाकिस्तानी मीडियानं दिलेल्या वृत्तानुसार या तोडफोडीची सुरूवात एका रॅलीतून झाली. या घटनेपूर्वी मंदिराजवळ जमात ए इस्लामची एक रॅली झाली. या रॅलीत कट्टरपंथी नेत्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केली. त्यानंतर या रॅलीतला कट्टरपंथीयांच्या जमावानं मंदिरावर चाल केली. या जमावाचं नेतृत्व एक मौलवी करत होता. पाहता पाहता या कट्टरपंथीयांनी हे मंदिर जमीनदोस्त केलं.
या संतापजनक घटनेनंतर पाकिस्तानातील हिंदू धर्मीय आक्रमक झाले आहेत. पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाबाहेर त्यांनी निदर्शनं करण्याची घोषणा केलीय. खैबर पख्तूनवाहच्या पोलिसांनीही कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र या घटनेमुळे पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवरील होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानात हिंदू असणं गुन्हा आहे की काय असंच चित्र या घटनेतून पुढं येतं आहे.