मुंबई : म्यानमारमधील हिंसाचार थांबत नाहीये. पार्सल बॉम्बचा स्फोट होऊन पाच जण ठार झाले आहेत. या स्फोटात नॅशनल लीग ऑफ डेमोक्रेसीचे (एनएलडी) खासदार यांचे निधन झाले आहे. मृतांमध्ये तीन पोलिस अधिकारी आहेत. संयुक्त राष्ट्रात चीनने म्हटलं की, म्यानमार गृहयुद्धेकडे वाटचाल करत आहे.
म्यानमारच्या दक्षिणेकडील भागात बेगो येथे पार्सल बॉम्बस्फोट झाला. येथे तीन बॉम्बस्फोट झाले, यापैकी पार्सल बॉम्बचा स्फोट घरात झाला. त्यात प्रादेशिक खासदार सु क्यू यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत तीन पोलीस अधिकाऱ्यांचा ही मृत्यू झाला आहे.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नाही. म्यानमारच्या सीमावर्ती भागातही बंडखोर सक्रिय झाले आहेत. या बंडखोरांवर यापूर्वी दोन विमानतळांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. आता या बंडखोरांनी असे म्हटले आहे की त्यांनी म्यानमार सैन्याच्या एका हेलिकॉप्टरला उडविले आहे.
फेसबुक पेजवर आणखी एक माहिती देण्यात आली आहे की बंडखोरांनी चीनच्या सीमेवर चार सैनिक ठार मारले आणि आठ सैनिक जखमी केले. यावर लष्करानेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
संयुक्त राष्ट्रातील चीनचे राजदूत झांग जुन यांनी म्यानमारची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचे म्हटले आहे. येथे मुत्सद्दी प्रयत्न अधिक तीव्र करण्याची गरज आहे. त्वरित पावले उचलली गेली नाहीत तर म्यानमारमध्ये गृहयुद्ध होऊ शकते.