close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

भारताचा राष्ट्रवाद हा नकारात्मक नाही- एस.जयशंकर

जगाशी व्यवहार करताना भारत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन गोष्टींमध्ये गल्लत करत नाही.

Updated: Oct 4, 2019, 04:48 PM IST
भारताचा राष्ट्रवाद हा नकारात्मक नाही- एस.जयशंकर

वॉशिंग्टन: भारताचा राष्ट्रवाद हा नकारात्मक नसल्याचे वक्तव्य परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी केले. ते शुक्रवारी जागतिक आर्थिक परिषदेच्या व्यासपीठावरून बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जगामध्ये भारत हा अपवादात्मक देश आहे. कारण, भारतामध्ये राष्ट्रवादाची भावना प्रबळ आहे. परंतु, जगाशी व्यवहार करताना भारत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय या दोन गोष्टींमध्ये गल्लत करत नाही. त्यामुळेच भारताचा राष्ट्रवाद नकारात्मक ठरवता येणार नाही, असे एस जयशंकर यांनी सांगितले. 

तत्पूर्वी एस.जयशंकर यांनी हेरिटेज फाऊंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीकास्त्र सोडले. प्रादेशिक सहकार्याचा विचार केवळ एकजण सोडून संपूर्ण शेजार चांगला आहे, असे जयशंकर यांनी म्हटले. यावेळी त्यांनी काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानकडून होणाऱ्या विरोधासंदर्भातही भाष्य केले. 

अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाकिस्तानकडून सर्व पातळ्यांवर विरोध होणार, ही बाब आम्हाला अपेक्षितच होती. या कार्यक्रमात तुम्ही पाकिस्तानकडून काय अपेक्षा करता, असा प्रश्नही एस.जयशंकर यांना विचारण्यात आला. तेव्हा एस. जयशंकर यांनी म्हटले की, आम्ही केवळ संयम आणि आनंदाची अपेक्षा करतो. 

मात्र, पाकिस्तान तसे करणार नाही. ते यामुळे विनाशच होईल, असे कायम सांगत राहणार. कारण, एक म्हणजे हीच त्यांची इच्छा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या ७० वर्षांपासून ते हाच प्रयत्न करत आहेत, असा टोला एस.जयशंकर यांनी पाकिस्तानला लगावला. 

केंद्र सरकारकडून ५ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आला होता. यासोबत काश्मीरचे विभाजन करून जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले होते.