पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीमुळे पंतप्रधान मोदींचं इस्राईलच्या पंतप्रधानांकडून कौतूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केली होती आयएसएची स्थापना

Updated: Nov 27, 2020, 07:46 PM IST
पर्यावरण क्षेत्रातील कामगिरीमुळे पंतप्रधान मोदींचं इस्राईलच्या पंतप्रधानांकडून कौतूक

यरुशलम : इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, पर्यावरण आणि कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी भारत आणि इस्राईल एकत्र काम करत आहेत. 2030 पर्यंत सौरऊर्जेपासून 25 टक्के उर्जा निर्मितीचे लक्ष्य दोन्ही देश एकत्रितपणे पूर्ण करतील. या दिशेने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, 'अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात नवनिर्मिती करण्याची गरज आहे. इस्राईल आणि भारत यांनी या क्षेत्राची ओळख करुन दिल्यानंतर आता सर्व देश यावर काम करत आहेत.

इंटरनॅशनल सोलर अलायंस भारताच्या नेतृत्वात काम करत आहे. भारत सौरऊर्जेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करत आहे. यामध्ये 80 देश सदस्य आहेत. दोन वर्षांसाठी ऑक्टोबर महिन्यात दुसर्‍यांदा या संस्थेच्या अध्यक्षपदी भारताची निवड झाली.

2015 च्या पॅरिसमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेदरम्यान आयएसएची स्थापना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांनी केली होती. पॅरिस हवामान करार पूर्ण होण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.