PM of Papua New Guinea Touches Feet Of Modi: ...अन् 'या' देशाचे पंतप्रधान विमानतळावरच मोदींच्या पाया पडले! पाहा Video

PM of Papua New Guinea Touches Feet Of Modi: जपानमधील जी-7 देशांच्या शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 3 देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून आपल्या पहिल्याच थांबव्यावर पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत झाल्याचं पहायला मिळालं.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 21, 2023, 06:38 PM IST
PM of Papua New Guinea Touches Feet Of Modi: ...अन् 'या' देशाचे पंतप्रधान विमानतळावरच मोदींच्या पाया पडले! पाहा Video title=
PM Modi James Marape

PM of Papua New Guinea Touches Feet Of Modi: जपानच्या हिरोशिमा शहरातील आंतरराष्ट्रीय जी-7 देशांच्या शिखर परिषदेमध्ये सहभागी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण पॅसिफिक महासागरातील पापुआ न्यू गिनीमध्ये दाखल झाले. स्थानिक वेळेनुसार रात्री पंतप्रधान मोदींचं विमान पापुआ न्यू गिनीमध्ये लॅण्ड झालं. पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यासाठी पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारपे हे स्वत: उपस्थित होते. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी विमानात बाहेर आल्यानंतर आधी मारपे यांनी मोदींची गळाभेट घेतली. त्यानंतर मारपे यांनी चक्क पंतप्रधान मोदींच्या पाया पडले. सध्या सोशल मीडियावर मारपे यांनी भारतीय प्रथा परंपरेनुसार मोदींचा आशीर्वाद घेतल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.

...अन् पंतप्रधान मोदींच्या पाया पडले

पंतप्रधान मोदींचं पापुआ न्यू गिनीमध्ये जंगी स्वागत झालं. पारंपारिक नृत्याबरोबरच थेट पंतप्रधान मारपे मोदींना रिसिव्ह करण्यासाठी विमानतळावर आले होते. पापुआ न्यू गिनीला भेट देणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. यापूर्वी कोणत्याही भारतीय पंतप्रधानाने या देशाला भेट दिलेली नाही. दक्षिण पॅसिफिक महासागरातील द्विपराष्ट्र असलेल्या पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान मारपे हे 52 वर्षांचे आहेत. यापूर्वी ते अनेकदा भारताच्या दौऱ्यावर आलेले आहेत. अनेकदा भारताने या छोट्या राष्ट्राला मदतही केली आहे. भारताशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे मारपे यांना भारतीय संस्कृतीची जाण आहे. त्यामुळेच ते वयाने मोठ्या असलेल्या पंतप्रधान मोदींचं स्वागत करताना त्यांच्या पाया पडल्याचं सांगितलं जातं आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेनं मारपे हे मोदींच्या पाया पडल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. मोदींनीही मारपेेंच्या खांद्याला पकडून त्यांना उभं राहण्यास सांगत पाठीवर शब्बासकीची थाप दिल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर

जपानमध्ये सुरु असलेल्या जी-7 देशांच्या शिखर परिषदेमध्ये आज पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याबरोबर चर्चा केली. भारत आणि ब्रिटनदरम्यानचे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासंदर्भातील चर्चा या दोन्ही नेत्यांनी केली. पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि वैज्ञानिक तसेच औद्योगिक क्षेत्रातील द्विपक्षीय सलोख्यासंदर्भात सुनक यांच्याबरोबर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी या क्षेत्रांमध्ये एकमेकांचे सहकार्य करण्यास होकार दर्शवला आहे. जपानमधील जी-7 देशांच्या परिषदेनंतर मोदी 3 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. याच दौऱ्यातील पहिला देश पापुआ न्यू गिनी हा आहे.