नवी दिल्ली : पुलवामा दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे 40 जवान मारले गेले. या घटनेनंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जगभरातील देशांनी या घटनेची निंदा केली. पण दरवेळे प्रमाणे पाकिस्तानने 'आम्ही ते नव्हेच' अशीच भूमिका घेतली आहे. या भ्याड हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. पाकिस्तान अशा दहशतवादी संघटनांना पाठीशी घालत असल्याचे वारंवार समोर आले आहे. जैश ए मोहमदच्या म्होरक्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करावे अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र समितीपुढे केली. पण चीनने आपल्या मत अधिकाराचा वापर करुन या मागणीला विरोध केला. असे असताना अमेरिका भारताच्या बाजूने भक्कम उभी असल्याचे दिसतेय. भारत जी काही कारवाई करेल त्याला अमेरिकेचा पाठिंबा असेल असं अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेकडूनही या हल्ल्याची निंदा करण्यात आली असून, पाकिस्तानला व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या प्रतिक्रियेतून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आसरा देणं आणि त्यांच्या क्रूर कारवायांचं समर्थन करणं ताबडतोब थांबवावं असं आवाहन व्हाईट हाऊसकडून करण्यात आलं.
जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्य़ासाठी अमेरिका भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल ट्रम्प प्रशासनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटले आहे. तसेच भारत जी काही कारवाई करेल त्यासाठी अमेरिका संपूर्ण राजनैतिक आणि गुप्तहेर पातळीवर पाठिंबा देईल असेही अमेरिकेने जाहीर केले आहे.
भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचा आम्ही पूर्ण आदर करतो असे अमेरिकेने जाहीर केलंय. ट्रम्प प्रशासनाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी दोन वेळा फोनवरून संपर्क साधला. पाकिस्तान सातत्याने काढत असलेल्या या कुरापतींचा भारताला योग्य वाटेल त्या प्रकारे समाचार घ्यावा अशा स्पष्ट शब्दात बोल्टन यांनी म्हटल्याचे समजते आहे. तसेच बोल्टन यांनी जारी केलेल्या पत्रकार जैश ए मोहम्मद सारख्या संघटनांवर पाकिस्ताननेही तातडीने कठोर कारवाई करावी अशी तंबी दिली आहे.