नवी दिल्ली : मसूद अजहर... डिसेंबर १९९९ च्या शेवटच्या आठवड्यात भारताच्या कचाट्यातून सुटलेल्या या खतरनाक दहशतवाद्यानं भारताच्या पाठीत अनेकदा खंजीर खुपसलाय आणि त्याला पाठिशी घालतोय पाकिस्तान... अवंतिपोऱ्यात भारतीय जवानांच्या रक्ताचा घोट घेणाऱ्या मसूद अजहरचं दुराचारी साम्राज्य संपवण्याची आता वेळ आलीय. अवंतिपोरा हल्ल्याचा सूत्रधार मसूद अजहर आजही पाकिस्तानात बिनबोभाट फिरतोय. भारताविरोधात कट-कारस्थानं रचतोय. भेकड हल्ल्यांमध्ये पटाईत असलेला मसूद अजहर पाकिस्तानात जैश ए मोहम्मदचं नेतृत्व करतो.
पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत जन्मला आलेला मौलाना मसूद अझहरला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा गजाआड केलं. मसूदला सोडवण्यासाठी त्याच्या साथीदारांनी २४ डिसेंबर १९९९ ला इंडियन एअरलाईन्सचं विमान आयसी ८१४ चं अपहरण केलं. अपहरण करून हे विमान अफगाणिस्तानात कंधारमध्ये नेण्यात आलं. प्रवाशांना वाचवण्यासाठी भारतानं तीन दहशतवाद्यांना सोडलं. त्यात मसूद अजहरचा समावेश होता. तेव्हापासून मसूद अजहरनं...
- मार्च २००० मध्ये जैश ए मोहम्मदची स्थापना केली.
- संसदेवर झालेला हल्ला
- जम्मू काश्मीरच्या विधानसभेवर झालेला हल्ला
- पठाणकोटच्या वायूसेना तळावर झालेला हल्ला
या सगळ्या हल्याची कारस्थानं मसूद अजहरच्या सडक्या डोक्यात शिजली. जैश ए मोहम्मद ही भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएई, इंग्लंड, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी 'दहशतवादी संघटना' म्हणून घोषित केली. पण पाकिस्तानात संघटना विनासायास फोफावतेय. मसूद अजहरला वाचवण्यासाठी पाकिस्तानला चीनचीही मदत मिळतेय.
संयुक्त राष्ट्रात भारतानं मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव अनेकदा मांडला. पण प्रत्येक वेळी चीननं त्यावर आक्षेप नोंदवला. संयुक्त राष्ट्रात चीनला मिळालेल्या नकाराधिकाराचा वापर करून प्रस्ताव फेटाळला. अवंतिपोऱ्यातल्या हल्ल्यानंतर भारतानं संयुक्त राष्ट्रात पुन्हा एकदा मसूद अजहरला दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारतानं पुन्हा एकदा केली. परंतु, आजही चीनने याला विरोध केला आहे. चीनने भारताच्या अपीलचे समर्थन करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आगामी काळात चीन आणि भारताचे संबंधही आणखी बिघडण्याची शक्यता आहे.