वॉशिंग्टन : जम्मू- काश्मीर येथे असणाऱ्या पुलवामा भागातील अवंतीपोरा येथे गुरुवारी दहशतवाद्यांनी एक आत्मघातकी हल्ला घडवून आणला. ज्या हल्ल्याचा आता सव्रच क्षेत्रांतून आणि इतर राष्ट्रांकडूनही तीव्र निषेध करण्यात येत आहे. अमेरिकेकडूनही या हल्ल्याची निंदा करण्यात आली असून, पाकिस्तानला व्हाईट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या प्रतिक्रियेतून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आसरा देणं आणि त्यांच्या क्रूर कारवायांचं समर्थन करणं ताबडतोब थांबवावं असं आवाहन व्हाईट हाऊसकडून करण्यात आलं.
पुलवामा हल्ल्याचा निषेध करत अमेरिकेकडून झालेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. त्यासोबतच शहीदांत्या कुटुंबीयांसोबत या दु:खाच्या प्रसंगाच आपलीही साथ असल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या विधानामध्ये त्यांनी तीव्र शब्दांमध्ये या घटनेची आणि कृत्याची निंदा केली असून, भारताच्या साथीने अमेरिकाही दहशतवादाशी लढण्यासाठी सक्रिय असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यासोबतच संयुक्त राष्ट्र परिषदेच्या प्रस्तावांचं पालन करत दहशतवादांना आसरा आणि त्यांचं समर्थन करण्यापासून दूर राहण्याचा इशाराही अमेरिकेकडून देण्यात आला आहे.
US Department of State: US condemns in the strongest terms the terrorist attack today on an Indian CRPF convoy in the Indian state of Jammu & Kashmir. We extend our deepest condolences to the victims & their families, & wish a speedy recovery to those injured.#PulwamaAttack (1/3) pic.twitter.com/tzeCbZzEsE
— ANI (@ANI) February 14, 2019
गुरुवारी पुलवामामध्ये झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली असून, या भीषण हल्ल्यात आतापर्यंत ४४ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बरेच जवान या हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जैश-ए- मोहम्मदकडून घडवून आणलेला हा हल्ला सुरक्षा दलावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं स्पष्ट होत आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक घेण्यात आली. ज्यानंतर येत्या काळात या हल्ल्याचं सडेतोड उत्तर देणार असल्याचं म्हणत पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकाकी पाडण्यार असल्याचा महत्त्वाचा निर्णय झाल्याचं अरुण जेटली यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितलं. सध्याच्या घडीला या हल्ल्याचं स्वरुप पाहता जम्मू- काश्मीर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, संबंधित परिसरात अद्यापही सैन्यदलाची कारवाई सुरू असल्याचं कळत आहे.