Smallest Monkey In The World: 'पिग्मी मार्मोसेट' हे जगातील सर्वात लहान माकड म्हणून प्रसिद्ध आहे. या माकडाचा आकार इतका लहान आहे की, ते फक्त बोटावर बसू शकते. नवजात पिग्मी मार्मोसेटची लांबी 5-6 इंच असते. या माकडाचं वजन 100 ग्रॅमपेक्षा जास्त नसतं. माकडाची ही प्रजाती दक्षिण अमेरिकेतील अॅमेझॉन जंगलात आढळते. माकडांची प्रजाती दुर्मिळ असल्याने तस्करीही केली जाते. अलीकडेच थायलंडहून चेन्नईला पोहोचलेल्या एका व्यक्तीकडून दोन पिग्मी मार्मोसेट जप्त करण्यात आले होते. त्यानंतर या माकडांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याला फिंगर मंकीं असंही म्हणतात. हे छोटं माकड 15 ते 20 वर्षे जगतं. पिग्मी मार्मोसेट माकडं झाडांवर 2 ते 9 गटाच्या समुहात राहतात. या समुहात एक पुरुष आणि एक मादी माकड गटप्रमुख असते.
झाडांमधून निघणारा डिंक या माकडांचं मुख्य अन्न आहे. झाडातून निघणारा डिंक ही माकडं चाटतात. त्याचबरोबर फुलपाखरांसारखे कीटक, फळे आणि लहान सरडे देखील खातात. अन्नाच्या शोधासाठी ही माकडं आपलं निवासस्थानही बदलत राहतात. एखाद्या झाडावर जोपर्यंत डिंक मिळतं तोपर्यंत ते तिथे राहतात. जर त्यांना डिंक मिळणं बंद झालं की ते दुसऱ्या झाडाकडे मोर्चा वळवतात.
बातमी वाचा- जगातील Dangerous Spiders! एकदा चावलं की खेळ खल्लास, जाणून घ्या प्रजातींबाबत
एका अहवालानुसार, जगात फक्त 2500 पिग्मी मार्मोसेट माकडाच्या प्रजाती शिल्लक आहेत. त्यांच्या राहण्याची ठिकाणं आता संपत चालली आहेत. त्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी होत असल्याने प्रजातींवर संकट ओढावलं आहे. हे पिग्मी मार्मोसेट पाळीव प्राणी नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. या माकडाची आयात निर्यात बेकायदेशीर आहे. दुसरीकडे, पाळीव प्राणी बनवून घरात ठेवण्यात गैर काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. मानवाने काळजी घेतल्यास ते जास्त काळ जगू शकतात, असा काही लोकांचा तर्क आहे.