Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत

 Video Python Swallows Woman Whole: ही महिला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक शासकीय अधिकाऱ्यांबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली असता तिच्या पतीला एक धक्कादायक गोष्ट दिसून आली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 9, 2024, 06:46 AM IST
Video: अजगराने तिला जिवंत गिळलं! पोट फाडून मृतदेह काढला; 4 मुलांच्या आईचा धक्कादायक अंत title=
धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे

Video Python Swallows Woman Whole: आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये एखाद्या महाकाय अजगराने एखाद्या व्यक्तीला जिवंत गिळल्याची दृष्यं पाहिली असतील. खास करुन हॉलिवूड चित्रपटांमध्ये असली दृष्यं अनेकदा दाखवली जातात. मात्र इंडोनेशियामध्ये खरोखरच एका अजगराने महिलेला जिवंत गिळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सेंट्रल इंडोनेशियामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी शनिवारी दिल्याचं वृत्त 'एएफपी' या वृत्तसंस्थे दिलं आहे.

कोण होती ही महिला?

अजगराने गिळलेल्या माहिलेची ओळख पटली आहे. या महिलेचं नाव फरिदा असं असून ती 45 वर्षांची होती. दक्षिण सुलावेसी प्रांतातील कालेमपांग गावात फरिदा तिच्या कुटुंबाबरोबर वास्तव्यास होती. फरिदाला अजगराने गिळल्याचं पहिल्यांदा तिच्या पतीच्याच लक्षात आलं. फरिदाला चार मुलं असून ती 6 जूनच्या सायंकाळी अचानक बेपत्ता झाली. ती घरी न आल्याने स्थानिक प्रशासनाबरोबरच गावकऱ्यांनी तिचा शोध सुरु केला. गावातील अनेक नागरिक तिच्या शोधकार्यामध्ये सहभागी झाले होते असं गावाचे प्रमुख असलेल्या सुराडी रोसाई यांनी 'एएफपी'ला सांगितलं. 

..अन् तिचं डोकं अजगराच्या पोटातून बाहेर आलं

फरिदाच्या पतीला तिच्या वस्तू एका निर्जनस्थळी आढळून आल्या. त्यानंतरच त्याला भलतीच शंका आली. गावकऱ्यांनी ज्या ठिकाणी या वस्तू सापडल्या त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध घेण्यास सुरुवात केली. आम्हाला त्याच भागामध्ये एक पोट फुगलेला भल्या मोठ्या आकाराचा अजगर आढळून आला, असं सुराडी यांनी सांगितलं. "अधिकाऱ्यांनी या अजगराचं पोट फाडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अजगराचं पोट फाडलं असता त्यामधून फरिदाचं डोकं बाहेर आलं," असं सुराडी म्हणाले. फिरादाला ज्या कपड्यांमध्ये घराबाहेर पडली होती त्याच कपड्यांमध्ये तिचा देह अजगराच्या पोटात सापडला. तिला अजगराने जसेच्या तसे गिळले होते. हा अजगर 5 मीटरचा म्हणजेच 16 फुटांचा होता. 

समोर आला धक्कादायक व्हिडीओ

'डेली मेल'ने या अजगराचं पोट फाडून महिलेचा मृतदेह बाहेर काढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

यापूर्वीही घडलेत असे प्रकार

अशाप्रकारे अजगराने संपूर्ण व्यक्तीला गिळण्याचे प्रकार फार दुर्मिळ असतात. मात्र इंडोनेशियामध्ये यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. मागील वर्षी अशाप्रकारे एका 8 मीटर लांबीच्या अजगराने एका शेतकऱ्याला गिळलं होतं. 2018 मध्ये एका 7 मीटर लांबीच्या अजगराच्या पोटात 54 वर्षीय बेपत्ता माहिलेचा मृतदेह आढळून आला होता.