Gliese 367b : ब्रम्हांड हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. आपल्या आकाशगंगेप्रमाणे हजारो आकाशगंगा या ब्रम्हांडात आहेत. वैज्ञानिक टेलिस्कोपच्या मदतीने नव नविन ग्रहांचा शोध घेत असतात. असाच एक एक्सोप्लॅनेट संशोधकांनी शोधला आहे. या ग्रहावर शुद्ध लोखंड मोठ्या प्रमाणात आहे. पृथ्वीपेक्षा जास्त आर्यन अर्थात लोखंड या ग्रहावर आहे. या ग्रहाची घनता देखील पृथ्वीपेक्षा दुप्पट आहे. ग्लीज 367बी (Gliese 367b) असे या ग्रहाचे नाव आहे.
ग्लीज 367बी हा एक एक्सोप्लॅनेट अर्थात बाह्यग्रह आहे. जर्मनीतील बर्लिन येथील ‘सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स’ या संस्थेतील क्रिस्टिन लॅम आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी याचा शोध लावला आहे. ट्रान्झिटिंग एक्सोप्लॅनेट सर्व्हे सॅटेलाइट (TESS) च्या मदतीने हा ग्रह शोधण्यात आला. या ग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा ग्रह मुख्यतः लोखंडाचा बनलेला आहे. ‘टेस’ या कृत्रिम उपग्रहावरील, ताऱ्यांची तेजस्वीता मोजणाऱ्या प्रकाशमापकाच्या मदतीनं हा ग्रह शोधण्यात आला आहे.
ग्लीज 367बी ग्रह लालबुंद आहे. दिसताना हा ग्रह धगधगत्या ज्वाळेप्रमाणे दिसतो. हा एक अल्ट्राशॉर्ट पीरियड ग्रह आहे. हा ग्रह जो ताऱ्या किंवा सूर्याभोवती फक्त 7.7 तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
पृथ्वीच्या तुलनेत या ग्रहाचे आकारमान 72 टक्के तर वस्तुमान 55 टक्के इतके आहे. हा ग्रह पाण्यापेक्षा आठपट घन आहे. या ग्रहाची ही घनता जवळपास लोखंडाच्या घनतेइतकी आहे. आपल्या ग्रहमालेतील बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ या घन ग्रहांचा गाभा हा मुख्यतः लोखंडाचा बनलेला आहे. या ग्रहाचा गाभासुद्धा लोखंडाचाच बनलेला असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र ग्रहाची घनता लक्षात घेता, या गाभ्यानं या ग्रहाचा मोठा भाग लोखंडाने व्यापला असण्याची शक्यता आहे. या ग्रहाच्या केंद्रापासून पृष्ठभागापर्यंतच्या व्यासाच्या सुमारे 86 टक्के भाग लोखंडाने व्यापलेला आहे. हा ग्रह आकारानं मंगळाएवढा असला तरी त्याची रचना ही बुध ग्रहासारखी आहे. या ग्रहाचा गाभा खूप दाट आहे. संपूर्णपणे लोखंडापासून बनविलेले. ज्याभोवती सिलिकेटने भरलेले आवरण आहे. याचे बाह्या आवरण देखील टणक झाले आहे. यामुळे याला नाजूक कडा नसल्याचा अंदाज आहे.