मास्को : Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्ध 22 दिवस झाले तरी संपायचे नाव घेत नाही. (Russia-Ukraine war 22 days) रशिया आपल्या बळाच्या जोरावर मोठी हानी करतेय. मात्र, युक्रेनची राजधानी कीववर कब्जा मिळवण्यासाठी रशियाला अजूनही संघर्ष करावा लागतोय. त्यात अमेरिकेने रशियावर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. त्यामुळे युद्धाच्या आगीत आणखीनंच तेल ओतले जाण्याची शक्यता आहे. (US strongly criticized on Russia)
रशियाचा युक्रेनवर भडीमार सुरूच आहे. पण अजूनही रशिया अपेक्षित यश मिळवू शकलेला नाही. रशियन फौजा कीव्ह जिंकण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहेत. त्यातच आता अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी पुतीन यांच्यावर घणाघाती हल्लाबोल केलाय. पुतीन हे वॉर क्रिमिनल आहेत अशा तीव्र शब्दातबायडेन यांनी पुतीन यांच्यावर बोचरी टीका केलीय. त्याला रशियानेही प्रत्युत्तर दिले आहे.
बायडेन यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पुतीन यांचं वर्णन वॉर क्रिमिनल असं केलं. बायडेन यांच्या वक्तव्याचा क्रेमलिनकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.बायडेन यांचे उद्गार अक्षम्य आहेत अशी टीका क्रेमलिनने केलीय. अमेरिकेनंच जगात विविध ठिकाणी हजारो माणसं मारली आहेत असा तिखट हल्ला रशियाने चढवलाय.
रशियाने अध्यक्ष जो बायडेन यांच्यासह अमेरिकेच्या 13 नेत्यांना रशिया बंदी केली आहे. रशियाचं या युद्धात अतिप्रचंड नुकसान होत आहे.
अमेरिकन रिपोर्टनुसार गेल्या 20 दिवसांत रशियाचे 7000 सैनिक ठार झालेत. यात 3 बड्या जनरल्सचाही समावेश आहे. रशियाचे 14 ते 24 हजार सैनिक गंभीररित्या जखमी झालेत. रशियन सैनिकांचं मनोबल पूर्णपणे तुटल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. लढण्याऐवजी ते वाहनं उभी करून परिसरात फिरत असतात असं या निरीक्षणात नोंदवण्यात आलंय.
दरम्यान शांतीचर्चेत युक्रेनने ऑस्ट्रिया आणि स्वीडनप्रमाणे न्यूट्रल स्टेटसचा प्रस्ताव रशियासमोर ठेवल्याची माहिती आहे. हा प्रस्ताव पुतीन यांना मान्य असल्याचं समजतंय. युद्ध आता अंतिम टप्प्यात असल्याची चिन्हं आहेत. पण त्यात अमेरिकेच्या बोचऱ्या टीकेमुळे युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.