3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल

युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत

Updated: Feb 28, 2022, 07:31 PM IST
3 डिग्री सेल्सिअस, 15 तास प्रतीक्षा आणि रोमानिया सैनिकांचा मार! भारतीय विद्यार्थ्यांचे हाल title=

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन वादाचा आजचा पाचवा दिवस असून युक्रेनमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढत आहेत. अशात ग्वाल्हेरच्या एका विद्यार्थ्यांनमी पाठवलेल्या व्हिडिओतून तिथल्या भीषण परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. हा व्हिडिओ युक्रेन-रोमानिया सीमेवरील आहे. यात रोमानियन सैन्य भारतीय विद्यार्थ्यांना क्रूर वागणूक देत असल्याचं दिसून येत आहे. 

ग्वाल्हेरच्या बिर्ला नगर इथला रहिवासी प्रतीक सोलंकी यांनी हा व्हिडिओ पाठवला आहे. त्याने सांगितलं की, गेल्या 13 तासांपासून तो आणि त्याचे साथीदार रोमानिया सीमेवर अडकले आहेत. इथलं तापमान उणे तीन अंश आहे. दुसरीकडे, रोमानियन सैनिक विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत. त्याचा व्हिडिओही त्याने पाठवला आहे. ज्यामध्ये विद्यार्थी एका जाळीच्या मागे उभे आहेत आणि रोमानियन सैनिक काही विद्यार्थ्यांना त्या पलीकडे हकलवताना दिसत आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांनी येथून लवकरात लवकर बाहेर काढण्याचं आवाहन केलं आहे. 

शाजापूरचा विद्यार्थी चार दिवसांपासून बेसमेंटमध्ये
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या वाईट परिस्थितीचा आणखी एक व्हिडिओ पाठवण्यात आला आहे. युक्रेनच्या कीवमध्ये अडकलेल्या शाजापूरच्या खुशी दुबेने बेसमेंटमधला व्हिडिओ पाठवला आहे. त्यांची बाहेर पडण्याची आशाच संपुष्टात आली आहे. भारतीय दूतावासाकडून सर्व विद्यार्थ्यांनी जिथे आहे तिथेच थांबावे असे सांगण्यात आलं आहे.

शाजापूर इथल्या नई रोडवर राहणाऱ्या शेरू दुबे यांची मुलगी खुशी दुबेने युक्रेनच्या कीव शहरातील बेसमेंचमध्ये आश्रय घेतला आहे. सोमवारी खुशीने तिच्या नातेवाईकांना व्हॉट्सअॅप कॉल केला आणि सांगितलं की तिला भारतीय दूतावासाने तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. इथं  अडकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रेल्वेच्या मदतीने बाहेर काढण्यात येईल, असंही सांगण्यात आलं.

शेजारील देशांची सीमा ओलांडल्यानंतर त्यांना विमानाच्या साहाय्याने भारतात आणले जाईल. अशा परिस्थितीत तिथे उपस्थित 100 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांनी तयारी सुरु केली. चार दिवसांपासून बेसमेंटमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना यामुळे आशेचा किरण दिसू लागला. पण काही वेळातच त्यांना आहे तिथेच आणखी काही दिवस थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण ट्रेन सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढणं सुरक्षित नसल्याचं सांगण्यात आलं.

खुशीचे वडील शेरू दुबे यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.  भारतीय दूतावासाच्या दुटप्पी वृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी आपल्या मुलीसह सर्व विद्यार्थ्यांना युद्ध परिस्थितीतून लवकरात लवकर घरी आणण्याची मागणी केली आहे.