Russia Bulava Missile: रशिया आणि युक्रेन (Ukraine) या देशांमध्ये सुरु असणारा संघर्ष काही केल्या थांबण्यातं नाव घेत नसतानाच रशियाच्या एका कृतीनं फक्त पाश्चिमात्य देशांची नव्हे, तर संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी 'द सेप्टर' नावाच्या आंतरमहाद्विपीय बॅलिस्टीक क्षेपणास्त्राला जगासमोर आणलं आहे. या अण्वस्त्रांना पाणबुडीतूनही नियंत्रित केलं जात असून, शत्रूचा अचूक भेद केला जातो. रशियन सैन्याच्या वतीनं एका व्हिडीओच्या माध्यमातून जगाला हादरा देणारी ही माहिती समोर आली असून, या नव्या परीक्षणामध्ये मिसाईलची कार्यक्षमता पाहायला मिळत आहे.
रशियन भाषेमध्ये 'बुलावा' असं या क्षेपणास्त्राचं नाव. अण्वस्त्रसाठा नेण्यास सक्षम असणाऱ्या या क्षेपणास्त्राची भेदक क्षमता 8304 किमी इतकी आहे. दरम्यान, ज्या व्हिडीओमुळं हा सर्व प्रकार जगासमोर आला त्यामध्ये पाण्यातच एक मोठा स्फोट होताना दिसत असल्याचं वृत्त 'द सन'नं प्रसिद्ध केलं. रशियानं सध्या केलेल्या क्षेपणास्त्राच्या या चाचणीला पाश्चिमात्य् आणि नाटो देशांसाठी सावधगिरीच्या इशाऱ्याच्या स्वरुपात पाहिलं जात आहे.
'आरएसएम-56 बुलावा' हे क्षेपणास्त्र अनेक कारणांनी जगाची चिंता वाढवत असून, त्याचा मारा पाणबुडीतूनही करता येतो. 40 फूट लांबी आणि 8304 किमी अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असणाऱ्या या क्षेपणास्त्रातून 10 अण्वस्त्र नेण्याची क्षमता आहे. याशिवाय या क्षेपमास्त्राच्या माऱ्यानं एकाच वेळी अनेक ठिकाणांना लक्ष्य करता येतं. 37 टन वजन आणि 1150 किलोग्रॅम पेलोड असणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या माध्यमातून जमीन, पाणी आणि हवेतून शत्रूवर मारा करणं सहज शक्य आहे.
मॉस्को इंस्टीट्यूट ऑफ थर्मल टेक्नोलॉजीनं तयार केलेल्या या क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठीचं काम 1990 च्या दशकात सुरु झालं होतं. रशियाकडून ही चाचणी पार पाडणं म्हणजे पाश्चिमात्य देशांना थेट अणूयुद्धाचा इशाराच देण्याचे संकेत मानले जात आहेत. या देशांनी युक्रेनला पाठिंबा देणं सुरु ठेवलं तर अण्वस्त्र हल्ला करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय रशियाकडे उरणार नाही, अशीच एकंदर रशियाची भूमिका पाहायला मिळत असून, असं झाल्यास त्याचे संपूर्ण जगावरही गंभीर परिणाम दिसण्याची भीती सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.
जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्र म्हणवल्या जाणाऱ्या अमेरिकेकडे 13000 KM पर्यंत मारा करणाऱ्या क्षमतेचं क्षेपणास्त्र आहे. त्याला अमेरिकेने 'मिनटमॅन 3' असे नाव दिलं आहे. प्रत्यक्षात याचा पल्ला 14000 KM असल्याचेही म्हटलं जातं. परंतु, इवलासा देश उत्तर कोरियाने 2017 मध्येच 13000 किमी रेंज असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. याला 'ह्वासोंग 15' या नावाने ओळखलं जातं.
रशियाच्या Satan 2 क्षेपणास्त्रापुढे हे काहीच नाही. 'सैतान' नावाच्या या क्षेपणास्त्राची रेंज तब्बल 18000 KM आहे. माध्यमांकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीवुसार, प्रत्यक्षात रशियाचे हे क्षेपणास्त्र 20000 किमी पर्यंत अचूक मारा करण्यास सक्षम आहे. यालाच 'फादर ऑफ ऑल बॉम्ब' असंही म्हटलं जातं.