मॉस्को : रशियामध्ये राष्ट्रपतीपदासाठी निवडणुकीची घोषणा झाली असून, निवडणूक शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेत पार पडावी यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे.
रशियाचा निवडणूक आयोगाने (सीईसी) निवडणूक प्रक्रिया तसेच, उमेदवारांना काही नियम व अटी घालून दिल्या आहेत. या नियम व अटींचे पालन करणे सर्व उमेदवारांना बंधनकारक असणार आहे. सीईसीचे अध्यक्ष एला पामफिलोवा यांनी सांगितले की, विद्यमान राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासह 23 उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.
राष्ट्रपती पदासाठी निवडणुक लढविण्यासाठी एक फेब्रुवारी 2018 पर्यंत सुमारे 30 लाख मतदात्यांचा स्वाक्षरीसह पाठिंबा असणे आवश्यक आहे. राष्ट्रपती पदासाठी 2018 मध्ये निवडणुका होत आहेत.
रशिया राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सामोरा जात असला तरी, उत्सुकता आहे ती पुतीन यांच्या उमेदवारीबाबतची. कारण काही दिवसांपूर्वीच पुतीन हे राजकारणातून निवृत्ती घेत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. पुतीन यांनी रशियाच्या राजकारणावर अल्पावधीतच मजबूत पकड निर्माण केली. तसेच, अध्यक्षपदावर आल्यापासून ते प्रदीर्घ काळ सत्तेत सत्तेत राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारणातही पुतीने हे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. त्यामुळे पुतीन यांच्या निवृत्तीच्या चर्चेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या.
दरम्यान, सूत्रांकडील माहितीनुसरा, महासत्ता अमेरिकेला टक्कर देणाऱ्या आणि जगातील दुसरी महासत्ता असे बिरूद एकेकाळी मिळवणाऱ्या रशियाच्या राजकारणात लवकरच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.