नवी दिल्ली : राजा-महाराजांचा राजेशाही थाट तुम्ही ऐकला असेलचं. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीसंदर्भात सांगणार आहोत ज्याने सुट्टीसाठी तब्बल ६४० कोटी रुपये खर्च केले आहेत.
सौदी अरेबियाचे राजे सलमान यांनी आपल्या शाही सु्टटीसाठी चक्क ६४० कोटी रुपये खर्च केलेत. हा आकडा ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण, ही रक्कम अनेक देशांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षाही अधिक आहे.
सौदी अरेबियाचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल सौद हे सुट्टीसाठी मोरक्को येथे पोहोचले. मोरक्कोच्या पंतप्रधानांनी राजे सलमान यांचं विमानतळावर जोरदार स्वागत केलं. सुट्टी दरम्यान, त्यांनी एक महिना मोरक्को येथे घालवला आणि या काळात ६०० कोटी रुपयांचा खर्च झाला.
२०० लग्झरी कार्स, ८०० रुम्सचं बुकींग
राजे सलमान यांच्या शाही सुट्टी दरम्यान त्यांच्यासोबत १००० लोकांचा स्टाफही होता. या राजासोबत आलेल्या माणसांसाठी मोरोक्कोतील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये ८०० रुम्सचं बुकींग करण्यात आलं होतं. राजासोबत आलेल्या गाड्यांव्यतिरिक्त २०० गाड्यांचा ताफा मागवण्यात आला होता.
राजे सलमान यांच्यासाठी ७४ एकर परिसरात तयार करण्यात आलेल्या पॅलेसचं बुकींग करण्यात आलं होतं. या पॅलेसमध्ये वैद्यकीय सुविधा, रेस्टॉरंट आणि इतरही अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
राजे सलमान हे आपल्या शाही अंदाजसाठी खुपच प्रसिद्ध आहेत. यापू्र्वीही त्यांच्या परदेश दौ-यात कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. याच वर्षी राजे सलमान आपल्या इंडोनेशिया दौ-यात खुपच शाही थाटात गेले होते. २०१५ सालचा त्यांचा अमेरिकन दौराही याच राजेशाही थाटामुळे चर्चेत राहीला होता.