'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही'

मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो. 

Updated: Sep 23, 2017, 10:48 AM IST
'...म्हणून महिलांना गाडी चालवायची परवानगी नाही' title=

रियाध : मुस्लिमबहुल सौदी अरेबियात महिलांच्या गाडी चालवण्यावर बंदी आहे हे तुम्हाला माहीतच असेल... पण, या बंदीला प्रोत्साहन देताना एका स्थानिक धार्मिक नेत्यानं केलेल्या वक्तव्यानं तुम्हालाही धक्का बसू शकतो. 

'द इविल्स ऑफ विमन ड्रायव्हिंग' या विषयावर आधारित एका भाषणात साद अल हिजरी या धार्मिक नेत्यानं महिलांकडे केवळ मेंदूचा एक चतुर्थांश भाग असतो, त्यामुळे त्या गाडी चालवण्यास अयोग्य असल्याचं म्हटलंय. पुरुषांपेक्षा महिलांकडे बुद्धीचा अभाव असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. 

'महिलांकडे केवळ अर्धा मेंदू असतो... आणि त्या जेव्हा शॉपिंग करायला जातात तेव्हा त्यांच्याकडे त्यातीलही अर्धाच मेंदू उरतो, असं सौदीच्या असिर प्रांतातील फतवा प्रमुख साद यांनी म्हटलंय. 

साद यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियात जोरदार टीका करण्यात आली. 'तुमच्यासारख्या कट्टर विचारांच्या व्यक्तींमध्ये कमी मेंदू असतो... महिला त्या आहेत ज्या पुरुषांना मोठं करतात, पुरुषांच्या यशामागे त्यांचा वाटा मोठा असतो' असं एका युझरनं म्हटलंय. 

यानंतर, साद यांच्यावर धार्मिक फतवे काढण्यास बंदी करण्यात आलीय. समाजात वाद निर्माण करणाऱ्या विचारांना आळा घालण्यासाठी त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचं असिर प्रांताच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.