पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या, जमावाने रस्त्यावर जाळला मृतदेह

सोशल मीडियावर या घटनेवर जगभरातून टीका केली जात आहे

Updated: Dec 3, 2021, 09:04 PM IST
पाकिस्तानात श्रीलंकन नागरिकाची निर्घृण हत्या, जमावाने रस्त्यावर जाळला मृतदेह

सियालकोट : पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एका श्रीलंकन ​​व्यक्तीची संतप्त जमावाकडून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर जमावाने त्याचा मृतदेह जाळला. या श्रीलंकन नागरिकांवर ईशनिंदेचा आरोप करत जमावाने त्याला बेदम मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे. याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही.

फॅक्ट्रीत मॅनेजर म्हणून करत होता काम
ही घटना पाकिस्तानमधील सियालकोट भागातील वरीजाबाद इथं घडली. इथल्या एका खासगी कंपनीत ही श्रीलंकन व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत होती. मृत श्रीलंकन व्यक्तीचं नाव प्रियंता कुमारा असं आहे. सियालकोट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंता कुमाराने पैगंबर मोहम्मद यांचं नाव असलेले काही पोस्टर्स फाडल्याचा आरोप फॅक्ट्रीतल्या कामगिरांनी केला. त्यानंतर भडकलेल्या कामगारांनी प्रियंता कुमारची हत्या केली. 

श्रीलंकन ​​नागरिकाच्या हत्येमागील नेमके कारण शोधण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडिओंमध्ये मोठा जमाव घटनास्थळी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. अनेक लोक मृतदेह जाळतानाचे व्हिडिओ बनवतानाही दिसत आहेत.

पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे, सियालकोटमधील भीषण घटनेने मी हादरलो आहे. आयजी पोलिसांना या घटनेची गांभीर्याने चौकशी करण्यास सांगण्यात आलं आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. या अमानुष कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही, असं उस्मान बुझदार यांनी म्हटलं आहे. 

पाकिस्तानच्या मानवाधिकार मंत्री शिरीन माजरी यांनीही ही घटना भयावह आणि निषेधार्ह असल्याचं म्हटले आहे. प्रत्येक गुन्ह्यासाठी सरकारचे कायदे आहेत. पंजाब सरकारने कठोर कारवाई करावी असं शिरीन माजरी यांनी म्हटलं आहे.

घटनेवर सोशल मीडियावर जोरदार टीका
पाकिस्तानातील या घटनेवरुन सोशल मीडियावर लोक प्रचंड संतापले असून सरकारकडे कठोर कारवाईची मागणी करत आहेत. जगभरातील मानवाधिकार संघटनांनीही या घटनेचा निषेध केला आहे.