Afghanistan Crisis : तालिबानच्या ताब्यातील पहिला दिवस, महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा, पाहा सध्याची धडकी भरवणारी परिस्थिती

महिलांसाठी तर इथे येत्या काळात नेमके काय आणि कसे निर्बंध लावण्यात येतील याचीच चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे.   

Updated: Aug 17, 2021, 01:57 PM IST
Afghanistan Crisis : तालिबानच्या ताब्यातील पहिला दिवस, महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा, पाहा सध्याची धडकी भरवणारी परिस्थिती  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून (Afghanistan) अफगाणिस्तानमध्ये सुरु असणारा सत्तासंघर्ष विकोपास गेला आणि अफगाण सैन्यानंही तालिबानपुढे (Taliban) हात टेकले. राष्ट्रप्रमुखांनीच देशातून काढता पाय घेतला आणि एका अर्थी तालिबानची पकड अफगाणिस्तानच्या नव्या पर्वाची सुरुवात करुन गेली. 

भीती आणि दहशतीचं हे पर्व पाहता देशातील अनेक नागरिकांनी जीवाच्या आकांतानं देश सोडण्याचा प्रयत्न केला. यातील काही यशस्वी झाले, तर काहींना अद्यापही तालिबानच्या तावडीतून सुटका करणं शक्य झालेलं नाही. अशातच तालिबानच्या अधिपत्याखाली अफगाणिस्तान, काबूलनं एक संपूर्ण दिवस काढला आहे. 

परिस्थिती पुरती बदलली आहे, सोशल मीडियावर माध्यमांच्या काही प्रतिनिनीधींनी अफगाणिस्तानातील विदारक परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुल येथे अनेक रस्त्यांवर तालिबानची माणसं गस्त घालताना दिसत आहेत. तर, देशातील नागरिकांच्या लाटाच येथी विमानतळावर धडकत आहेत. 

Event image
महिलांच्या पोस्टरची अशी अवस्था करण्यात येत आहे. बहुतांश ठिकाणहून हे पोस्टर हटवले गेले आहेत.- छाया सौजन्य- ट्विटर

येथील बाजारपेठांमध्ये दुकानांना टाळीच आहेत. तालिबानकडून परवानगी मिळाल्यानंतरच इथं दुकानं सुरु करण्यात येतील असं स्थानिकांकून सांगण्यात येत आहे. दरम्यान, काबूलमध्ये आणि अफगाणिस्तानातील काही भागांमध्ये हिंसाही पाहायला मिळत आहे. 

अफगाण महिलांच्या दृष्टीनं हे अतिशय वाईट पर्व असल्याचं खंत सध्या सत्र स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे. काबूलवर तालिबानची सत्ता आल्यानंतर इथं सलून, पार्लर, टेलरची दुकानं, प्लास्टिक सर्जरी सेंटर अशा ठिकाणी असणारे महिलांचे पोस्टर आणि छायाचित्र हटवण्याचं काम सुरु आहे. तालिबानच्या दहशतीमुळं हे चित्र पाहायला मिळत आहे. एका अर्थी येथील महिलांचं होतं नव्हतं ते स्वातंत्र्यही धोक्यात आहे. 

अफगाणिस्तानात काही वाहिन्यांनी दैनंदिन कार्यक्रमांवजी इस्लाम धर्माशी संबंधीत कार्यक्रम दाखवण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी महिला सूत्रसंचालकांना दाखवण्यास बंदी केली आहे. माध्यमानचं स्वातंत्र्यही धोक्यात आलं असून, त्यांचंही तालिबानीकरण झाल्याची चिंताग्रस्त बाब अफगाणिस्तानातील दृश्य पाहतानात दिसतेय.