नवी दिल्ली : बालाकोटमधल्या हल्ल्याला नुकतीच २ वर्षं पूर्ण झाली. या हल्ल्यात मिराज 2000 विमान आणि स्पाईस 2000 बॉम्बची उपयुक्तता सिद्ध झालीये. त्याच वेळी तेजस या संपूर्ण भारतीय फायटर विमानाचं अमेरिकेत कौतुक झालं आहे. बालाकोटमध्ये भारतीय वायूदलानं केलेल्या एअरस्ट्राईकमध्ये मिराज 2000 या अत्याधुनिक विमानांचा वापर केला आणि त्याच वेळी त्याची उपयुक्तता सिद्ध झाली. या विमानासोबत स्पाईस 2000 या बॉम्बची जोडी जास्त खतरनाक आहे.
ताशी 2000 किलोमीटर वेगानं उडू शकणारं मिराज हे मल्टीरोल एअर सुपिरिअॅरिटी फायटर एअरक्राफ्ट आहे. हवेतून जमीनीवर हल्ला करण्याची या विमानाची क्षमता आहे. व्हॉईस रेकग्नेशन सिस्टीमनं युक्त असलेलं मिराज 2000 हे उत्तम फायटर जेट मानलं जातं. तर स्पाईस 2000 हा GPS गाईडेड बॉम्ब आहे. कॉम्युटरवर लक्ष्य फीड करून त्याचा अचूक वेध घेता येतो. 60 ते 70 किलोमीटर दूरवरूनही हा बॉम्ब अचूक लक्ष्य टिपतो.
1999च्या कारगिल युद्धात सर्वप्रथम लेझर गायडेड मिसाईलचा वापर भारतानं केला. ते शक्य झालं मिराज 2000 विमानांमुळेच... एकीकडे मिराज आपली कामगिरी चोख बजावत असताना वायुदलाच्या ताफ्यातलं सर्वात नवं आयुध म्हणजे तेजस... संपूर्ण भारतीय बनावटीचं हे फायटर जेट चिनी विमानांपेक्षा उत्तम असल्याचं आता सिद्ध झालं आहे. आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असलेल्या तेजसची अमेरिकास्थित 'फॉरेन पॉलिसी' या प्रथितयश मासिकानं स्तुती केली आहे.
- 'तेजस' MK 1A हे अमेरिकेच्या F-16 पेक्षा जास्त किफायतशीर आहे.
- शिवाय चीनच्या फाइटर विमानांपेक्षा अधिक भरवशाचं आहे.
- आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण निर्यातीचा 'पोस्टर बॉय' म्हणून तेजसकडे पाहिलं जातंय.
लेहसारख्या दुर्गम भागातील आव्हानं पेलण्याची तेजसची क्षमता किती आहे, याची नुकतीच चाचणी घेण्यात आली. बहारीनमध्ये झालेल्या एअर शोमध्ये तेजसनं सर्वांचीच मनं जिंकली. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स वायूदलाला 83 तेजस MK 1 A विमानं देणार आहे. MK 1A हे तेजसचं अॅडव्हन्स व्हर्जन आहे. 2023पर्यंत ही 40 जेट वायुसेनेच्या ताफ्यात समाविष्ट झाली असतील.