World Most Expensive Mango: उन्हाळ्यामधील अनेकांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे हा सिझन आंब्यांचा असतो. तसं हल्ली फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्येच बाजारांमध्ये आंबे दिसू लागतात. मात्र अनेकदा हे आंबे परवडणाऱ्या दरात नसतात. सिझनच्या सुरुवातीलाच आंबे खायचे म्हणजे किमान हजार रुपये मोडावे लागणार हे निश्चितच. अर्थात नंतर हळूहळू आंब्याचे दर तसे आवाक्यात येतात. मात्र एक व्यक्ती चक्क 19 हजार रुपये नग दराने आंबे विकतोय असं तुम्हाला सांगितल्यास नक्कीच आश्चर्य वाटेल ना?
19 हजार रुपये नग दराने आंबेविक्री करणारा हा शेतकरी भारतामधील नसून जपानमधील आहे. हिरोयुकी नाकागवा नावाच्या या व्यक्तीने जपानच्या सर्वात उत्तरेकडील बेटावर असलेल्या तोकाची या थंड हवामानाच्या जिल्ह्यात आंब्यांचं उत्पादन घेतलं आहे. मात्र या जिल्ह्याच्या वातावरणापेक्षा आंब्याचे दर चर्चेत आहेत. हे आंबे जगातील सर्वात महागाडे आंबे आहेत. एका आंब्यासाठी ही व्यक्ती 230 अमेरिकी डॉलर्स आकारते. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये एक आंबा 18 हजार 892 रुपयांना आहे. हिरोयुकी हा जपानमध्ये 2011 पासून आंब्यांचं उत्पादन घेत आहे.
शास्वत शेतीचा प्रयोग करताना हिरोयुकीला आंब्यांचं उत्पादन घेण्याची कल्पना सुचली आणि त्यामधूनच हा जगातील सर्वात महागडा आंबा निर्माण झाला. हिरोयुकीने आपल्या होकायडो या गावामध्ये आंब्याची रोपं लागवली. हे गाव बर्फवृष्टीसाठी आणि उष्ण पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. हिरोयुकी हिवाळ्यात पडणारा बर्फ साठवून ठेवायचा आणि त्याचा वापर उन्हाळ्यामध्ये आपल्या शेतातील ग्रीनहाऊसमध्ये गारवा निर्माण करण्यासाठी करु लागला. यामुळे आंब्याला नैसर्गिक मोहोर येण्याचा कालावधी पुढे ढकलला गेला. त्यानंतर तो हिवाळ्यामध्ये उष्ण पाण्याच्या झऱ्यांचा वापर करुन सामान्यपणे आंब्यांचं सिझन नसलेल्या हिवाळ्यात 5 हजार आंब्यांचं उत्पादन घेऊ लागला.
याच अनोख्या संकल्पनेमुळे डिसेंबरमध्ये गावातील तापमान उणे 8 डिग्री सेल्सीयस असताना हिरोयुकी त्याच्या ग्रीनहाऊसमध्ये डिलेव्हरीसाठी आंबे पॅक करत असतो. त्याच्या ग्रीनहाऊसमधील तापमान हिवाळ्यात 36 डिग्री सेल्सीयस इतकं असतं. हिवाळ्यात आंबे पिकत असल्याने त्याला किड लागत नाही कारण हिवाळ्यात फार कमी किटक सक्रीय असतात. त्यामुळेच हिरोयुकीला आंब्यांवर औषधांची फवारणी करावी लागत नाही. तसेच हिवाळ्यात आंब्यांचं उत्पादन घेत असल्याने हिरोयुकीला कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत नाही. या शास्वत शेतीच्या प्रयोगामुळे हिरोयुकीच्या ग्रीनहाऊसमधील आंबे हे सामान्य आंब्यांपेक्षा अधिक गोड असतात असा दावा तो करतो. तसेच हिवाळ्यामध्ये पिकवलेल्या या आंब्यांवर सुरकुत्याही कमी पडतात.
हिरोयुकी हा पूर्वी तेल उद्योगात होता. मात्र तेल उद्योगामधील वाढत्या किंमती लक्षात घेऊन कमाईचे इतर मार्ग शोधले पाहिजेत असं हिरोयुकीला वाटू लागलं. त्यानंतर काही आंबा उत्पदाकांच्या मदतीने हिरोयुकीने नोरावर्क्स जपान नावाने स्टार्टअप कंपनी सुरु करुन आंब्यांचं उत्पादन हिवाळ्यात घेण्याचा प्रयगो सुरु केला. काही वर्षानंतर हिरोयुकीने आपल्या ग्रीनहाऊसमधील आंब्यांचे हक्क राखीव करुन घेत या आंब्याला 'हॅकुगीन नो तियाओ' असं नाव दिलं. या नावाचा अर्थ बर्फातील सूर्य असा होतो.
हिरोयुकीच्या या ऑफ सिझन मँगोंना जपानमध्ये तुफान मागणी आहे. 2014 मध्ये हे आंबे 400 अमेरिकी डॉलर्सला विकला गेला होता. आजही या आंब्यांना जपानमध्ये चांगली मागणी आहे. या उद्योगामुळे गावातील स्थानिकांना चांगला रोजगारही उपलब्ध झाला आहे.