Star Swallowing A Planet: पृथ्वीचा विनाश यासंदर्भात वाचताना, पाहता किंवा ऐकताना तुम्ही नक्कीच सुर्यच पृथ्वीला गिळून टाकणार हे विधान ऐकलं असेल. अगदी वर्षांच्या आकडेवारीसहीत सुर्य पृथ्वीला गिळणार यासंदर्भातील दावा आपल्यापैकी अनेकांच्या वाचनता किंवा ऐकण्यात आला असेल. पृथ्वीचं भविष्य काय असणार याबद्दलची चर्चा आत्तापर्यंत ऐकत आलो असलो तरी वैज्ञानिकांनी पहिल्यांदाच हा सारा प्रकार कसा घडेल याची झलक अन्य एका ग्रहाच्या विनाशाच्या स्वरुपात टीपली आहे. एखाद्या मोठ्या ताऱ्याने ग्रह गिळण्याचा हा सारा घटनाक्रम पहिल्यांदाच नोंदवला गेला आहे.
नासाच्या वैज्ञानिकांनी यापूर्वी तारा जवळच्या ग्रहाला गिळतो हे अनेकदा घटना घडून गेल्यानंतर ताऱ्यांच्या कमी जास्त होणाऱ्या प्रकाशावरुन आणि त्यामधून निघणाऱ्या विद्युत लहरींच्या माध्यमातून नोंदवलं आहे. मात्र यावेळेस प्रत्यक्षात हा ग्रह ताऱ्याकडून गिळला जाण्याआधीपासूनची नोंद नासाला यशस्वीरित्या करता आली आहे. 'नेचर' या नियतकालीकेमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये सुर्यासारख्या ताऱ्याने त्याच्याभोवती भ्रमण करणाऱ्या ग्राहाला गिळल्याचा संपूर्ण घटनाक्रम नोंदवला गेल्याचा सांगण्यात आलं आहे. सविस्तर आकडेवारीसहीत हा लेख प्रकाशित करण्यात आला आहे.
आपली सूर्यमाला असलेल्या आकाशगंगेमध्ये म्हणजेच मिल्की वे आकाश गंगेमध्ये पृथ्वीपासून 12 हजार प्रकाशवर्ष अंतरावर हा सारा घटनाक्रम घडला. हार्डवर्ड विद्यापिठामधील एमआयटी आणि अवकाश निरिक्षण करणाऱ्या कॅलटेक या संस्थेच्या च्या शास्त्रज्ञांनी या घटनाक्रमाची नोंद केली आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये ज्या ताऱ्याने ग्रह गिळला तो तारा 10 दिवस फार जास्त प्रकाशित होत होता. त्यानंतर हळूहळू त्याचा प्रकाश कमी झाला. म्हणजेच ग्रह गिळल्यानंतर तारा अधिक प्रकाशमान झाला आणि नंतर त्याचा प्रकाश मंदावला असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. ही घटना घडल्यानंतर या ताऱ्याकडून कोल्ड सिग्नल्स मिळाले. याचवरुन शास्त्रज्ञांनी हा संपूर्ण घटनाक्रम ताऱ्याने ग्रह गिळण्याचाच असल्याचं म्हटलं आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या कोल्ड सिग्नल्सचा अभ्यास करुन हा अहवाल प्रकाशित करण्यात आळा होता तो मे 2020 मध्येच वैज्ञानिकांना मिळाला होता. मात्र यावर अभ्यास करण्यासाठी आणि त्याचा नेमका अर्थ काढण्यासाठी वैज्ञानिकांना 2 वर्षांचा कालावधी लागला.
(Photo- Caltech/IPAC)
"सध्या हा तारा ग्रह गिळल्यानंतरच्या शेवटच्या टप्प्यात आहे," असं या 'नेचर'मध्ये छापून आलेल्या अहवालात म्हटलं आहे. किशॅले डे यांच्या नेतृत्वाखालील गटाने हा अहवाल प्रकाशित केला आहे. जो ग्रह या ताऱ्याने गिळला तो आपल्या सुर्यमालेतील गुरु ग्रहाच्या आकाराचा उष्ण ग्रह होता असंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. आधी हा ग्रह या ताऱ्याच्या दिशेने गुरुत्वाकर्षणामुळे खेचला गेला आणि नंतर तो त्याच्या गर्भात सामावला गेला असंही या अहवालात म्हटलं आहे.
Photo - NASA
पृथ्वीबरोबरही 50 लाख वर्षांनंतर या ग्रहासारखं होणार असल्याचं सांगितलं जातं. 50 लाख वर्षानंतर सूर्य अधिक प्रखर होईल आणि तो पृथ्वीला गिळेल असं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. सुर्यमालेतील सुर्याजवळचे अनेक ग्रह सूर्य गिळेल याचाच संदर्भ देत या अहवालामध्ये, "आपण पृथ्वीचं भविष्य काय आहे हे पाहत आहोत," असं अहवाल लिहिणाऱ्या किशॅले डे यांनी म्हटलं आहे. "10 हजार प्रकाशवर्ष अंतरावरुन परग्रहावरील कोणी आपल्या सुर्यमालेला पाहत असेल तर त्यांना सूर्य पृथ्वी गिळताना तो अचानक प्रकाशमान झालेला दिसेल. कारण त्यावेळेस सूर्य काही पदार्थांचं उत्सर्जन करेल. यामुळे धुळीचे ढग निर्माण होऊन सूर्य पुन्हा आधीसारखाच दिसेल," असं किशॅले डे यांनी सांगितलं.