मनिला : वादळाच्या तडाख्याने 133 जण मृत्यूमुखी पडले आहेत
फिलीपाईन्समधलं दुसऱ्या क्रमाकाचं बेट मिंडानाओला याचा सर्वात मोठा तडाखा बसला आहे. हे बेट पूराच्या वेढ्यात सापडलय. नदीच्या पाण्यात अनेक मृतदेह वाहून गेले आहेत. या वादळाला तेंबीन असं नाव देण्यात आलंय.
फिलीपाईन्सला दरवर्षी सर्वसाधारणपणे 20 मोठ्या वादळांचा तडाखा बसतो. पण 2 कोटी लोकसंख्या असलेल्या मिंडानाओ या मोठ्या बेटाला क्वचितच या प्रकारच्या तडाख्याला सामोरं जावं लागतं. वादळामुळे सगळीकडे चिखल आणि पाण्याचं साम्राज्य आहे. आतापर्यंत 133 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर अनेकजण बेपत्ता आहेत.
पोलिस, सैनिक आणि स्वयंसेवक चिखल खणून, ढिगारे उकरून मृतदेहांचा शोध घेत आहेत. वादळामुळे नदीला मोठ पूर आला आहे. पूराच्या पाण्यात बरीचशी घरं वाहून गेली आहेत किंवा पूराच्या वेढ्यात अडकली आहेत. या वादळाची सूचना अगोदरच देण्यात आली होती परंतु या बेटाला सहसा वादळाचा तडाखा बसत नसल्यामुळे बहुसंख्य नागरिकांनी या धोक्याच्या सूचनेकडे दुर्लक्षच केलं.