डोनल्ड ट्रंप आणि इमरान खान यांच्यात रंगलं ट्विटर वॉर

ट्रंप यांच्या निर्णयाने पाकिस्तानचा तिळपापड

Updated: Nov 20, 2018, 07:16 PM IST
डोनल्ड ट्रंप आणि इमरान खान यांच्यात रंगलं ट्विटर वॉर title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रध्याक्ष डोनल्ड ट्रंप आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यात सध्या ट्विटर वॉर रंगल आहे. पाकिस्तानला सैन्याची रसद पुरवण्याचा निर्णय मागे घेतल्याचा निर्णय योग्यच असल्याचं सांगत अमेरिकेने पाकिस्तानला फटकारल आहे तर इम्रान खान यांनी दहशतवादी कृत्यांमुळे पाकिस्तान सर्वात त्रस्त देश असल्याचं म्हटलं आहे. नऊ अकराच्या हल्ल्यात एकही पाकिस्तानी सहभागी नव्हता. अमेरिकेच्या दहशतवादविरोधी लढाईत ७५ हजार पाकिस्तानी नागरिकांचे प्राण गेल्याचा पलटवार इमरान खान यांनी केला आहे. 

अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रंप यांनी काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानला सुनावलं आहे. ट्रंप यांनी म्हटलं की, पाकिस्‍तानने अमेरिकेसाठी केलं तरी काय आहे. त्यांनी फक्त दहशतवाद्यांना आश्रय देऊन त्यांची डोकेदुखी वाढवली आहे. ट्रंप यांनी रविवारी पाकिस्तानला आर्थिक मदत बंद केल्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. यावर्षी अमेरिकेने पाकिस्‍तानला दिली जाणारी 2 बिलियन डॉलरची लष्करी मदत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

ट्रंप यांनी पुन्हा एकदा ओसामा बिन लादेनच्या नावाचा संदर्भ देत पाकिस्तानच्या धरतीवर दहशतवाद कसा सक्रीय आहे. याबाबत त्यांनी उल्लेख केला. लादेन पाकिस्तानातच होता आणि अमेरिकेची मदत घेत होता. राष्‍ट्राध्यक्ष ट्रंप यांनी दहशतवाद्यांना सुरक्षित आधार देणाऱ्या पाकिस्‍तानवर टीका केली. ट्रंप यांनी म्हटलं की, पाकिस्‍तान त्या लोकांना आश्रय देतो आहे जे अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेच्या नागरिकांची हत्या करत आहेत. 

ट्रंप यांनी फॉक्‍स न्‍यूजला दिलेल्या इंटरव्‍यूमध्ये म्हटलं की, 'ओसामा बिन लादेन पाकिस्‍तानमध्ये राहत होता. आणि अमेरिका पाकिस्तानला मदत करत होती.' रविवारी प्रदर्शित झालेल्या या मुलाखतीत ट्रंप यांनी म्हटलं की, 'आम्ही पाकिस्‍तानला एका वर्षाला जवळपास 1.3 बिलियन डॉलरची मदत करत होतो. पण आता त्यांनी मदत नाही मिळणार. मी ही मदत यासाठी बंद केली कारण त्यांनी आपल्यासाठी एक छोटं कामही केलेलं नाही.' ज्यावेळी लादेन मारला गेला तेव्हा अमेरिकेने पाकिस्तानवर दहशतवाद्यांना आश्रय दिल्याने जोरदार टीका केली होती.