पाकिस्तानला दणका, हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सुरक्षा परिषदेची परवानगी

भारताला पहिलं मोठं यश

Updated: Feb 22, 2019, 08:33 AM IST
पाकिस्तानला दणका, हल्ल्याचा बदला घेण्यासाठी सुरक्षा परिषदेची परवानगी title=

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पहिला मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पुलवामा हल्ल्याचा एकमुखाने जोरदार निषेध केला. एवढंच नाही तर जैश ए मोहम्मद ही दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणल्याचंही म्हटलं आहे. सुरक्षा परिषदेत चीनही कायमस्वरूपी सदस्य आहे. अझर मसूदला दहशतवादी घोषीत कऱण्याविरोधात चीन सातत्याने नकाराधिकार वापरत होतं. त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा परिषदेच्या या ठरावाला महत्त्व आहे. जागतिक सुरक्षा आणि शांततेला कोणत्याही स्वरूपातला दहशतवाद धोकादायक असल्याचं सुरक्षा परिषदेनं मान्य केलं आहे. दहशतवादाला थारा देणं, त्यांना आपल्या जमिनीचा वापर करू देणं, त्यांना कोणतीही मदत करणं तातडीने थांबवलं पाहिजे असं सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. दहशतवादाविरोधात भारताने उघडलेल्या आघाडीला तसंच पुलवामा हल्ल्यासंदर्भात सुरू असलेल्या तपासाला सर्वच देशांनी मदत केली पाहिजे असं मत सुरक्षा परिषदेने व्यक्त केलं आहे. नाव न घेता पाकिस्तानला सुरक्षा परिषदेने हा इशारा दिला आहे. 

चीनने सुरक्षा परिषदेत आडकाठी टाकली पण यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. भारत पाकिस्तानला चारही बाजुंनी घेरण्याचा प्रयत्न करत आहे. संपूर्ण जगात पाकिस्तान विरोधी भावना तयार झाली आहे. भारताला या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी देखील सुरक्षा परिषदेने परवानगी दिली आहे. सुरक्षा परिषदेने आवाहन केलं आहे की, 'पुलवामा हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी सगळ्या देशांनी भारताला मदत केली पाहिजे.'
 
सुरक्षा परिषदेने या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात असल्याचं मान्य करत संयुक्त राष्ट्राच्या १५ शक्तीशाली देशांसमोर त्याचा निषेध केला. यूएनएससीने म्हटलं की, 'सुरक्षा परिषदेचे सदस्य १४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करते. ज्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदने घेतली आहे.' दहशतवाद हा आंतररष्ट्रीय शांती आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.'