अमेरिकेत आरोग्य व्यवस्था कोलमडली, ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र

कोरोनाचं संकट ट्रम्प यांनी गांभीर्यानं घेतलं नाही?

Updated: Mar 31, 2020, 04:56 PM IST
अमेरिकेत आरोग्य व्यवस्था कोलमडली, ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र title=

न्यूयॉर्क /

अमेरिकेत अनपेक्षितपणे वेगानं पसरलेला कोरोना व्हायरस आणि सरकारकडून साथ रोखण्यासाठी झालेला उशीर यामुळे अमेरिकेच्या मीडियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीकास्त्र सोडलं जातंय.

महासत्ता असलेल्या अमेरिकेतील वैद्यकीय सेवेचे तीनतेरा वाजले असून त्यातल्या त्रुटी प्रामुख्यानं समोर आल्या आहेत. त्यामुळे ट्रम्प मीडियाच्या टीकेचे लक्ष झाले आहेत.

अमेरिकेत कोरोना व्हायरस इतक्या वेगानं पसरला की जगभरात सर्वाधिक १ लाख ६३ हजारांहून अधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. तर तब्बल ३१०० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय.

सलग चार दिवस अमेरिकेत रोज १५ हजारांहून रुग्ण वाढत आहेत. अमेरिकेत शुक्रवारी ४००, शनिवारी ५२५ आणि रविवारी ५७३ जणांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेतील महत्वाचं शहर असलेल्या एकट्या न्यूयॉर्कमध्येच जवळपास ६० हजार रुग्ण आहेत. तर न्यूयॉर्कमध्ये तब्बल १३४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मुंबईप्रमाणेच कधीही न थांबणारं शहर अशी ओळख असलेलं न्यूयॉर्क शहर पूर्णतः ठप्प झालं आहे.

‘’लोक मरत आहेत. ही संख्या पुढच्या काही दिवसांत वाढतच जाईल. लोक घाबरले आहेत,’’ असं न्यूयॉर्क सिटी कौन्सिल सदस्य फ्रान्सिस्को मोया यांनी म्हणाले.

न्यूयॉर्क टाइम्सनं म्हटलंय, ‘’सर्व सार्वजनिक हॉस्पिटल रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत. रुग्णांची प्रचंड गर्दी झाली आहे. ते फक्त इतरांना मदत करा एवढंच म्हणू शकतात.’’

हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानं हॉस्पिटलमधलं वर्णन ‘सर्वनाश’ अशा शब्दात केलं. ‘’काही लोकांचा मृत्यू झालाय आणि स्थानिक नागरिकांनी तपासणी आणि चाचणीसाठी रांगा लावल्या आहेत.’’

न्यूयॉर्क पोलिसांसाठीही चित्र अजिबात आशादायक नाही. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ५५२ पोलिस कोरोनाबाधित आहेत आणि दोघांचा मृत्यू झालाय. याशिवाय ४१११ पोलीस आजारी असल्यानं सुट्टीवर गेलेत.

अमेरिकेत कोरोना व्हायरसला तोंड देण्यास प्रशासनानं उशीर केल्याचा आरोप होतोय. त्यातच यंत्रणेनं तत्परता दाखवली नाही, अशीही टीका होतेय.

कोरोनाशी लढण्यासाठी अमेरिकेनं तयारीच केली नव्हती आणि या साथीला तोंड देण्यात आलेल्या अपयशाची जबाबदारी खुद्द ट्रम्प यांनीच घ्यायला हवी, अशी टीका अमेरिकेच्या माध्यमांकडून होत आहे.

जेव्हा कोरोनाची साथ आली, तेव्हा ट्रम्प यांनी दुर्लक्ष केलं, फारसं महत्व दिलं नाही. एवढंच नाही तर अजूनही ते इस्टरपर्यंत पुन्हा सर्व सुरळीत होईल असं सांगत राहिले. कोरोनाचा धोका मोठा आहे आणि तो बराच काळ राहील, असं एकीकडे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत असताना ट्रम्प यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं माध्यमांचं म्हणणं आहे.

जुलैपर्यंत ८१ हजार बळी जाऊ शकतात, असा अंदाज युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनच्या इन्स्टिट्यूटनं व्यक्त केला आहे. याशिवाय अमेरिकेतील रुग्णालयांत पुरेसे व्हेंटिलेटर्स नाहीत, अशा इशाराही फेडरल अधिकाऱ्यांनी दिला होता.