ट्रम्प अमेरिकी राष्ट्रध्यक्ष झाल्यास मोठा खुलासा? म्हणाले, 'मी नक्कीच UFO चे Videos...'

US Presidential Election: ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस असा थेट संघर्ष होणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. असं असतानाच दोन्ही नेते मुलाखती देताना पाहायला मिळत असून ट्रम्प यांनी अशीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी केलेलं विधान अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 8, 2024, 12:16 PM IST
ट्रम्प अमेरिकी राष्ट्रध्यक्ष झाल्यास मोठा खुलासा? म्हणाले, 'मी नक्कीच UFO चे Videos...' title=
एका मुलाखतीत बोलताना केलं भाष्य

US Presidential Election: अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. या वेळेस डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस अशी लढत पाहायला मिळणार असून दोन्ही उमेदवार आपआपली पक्की करण्याच्या उद्देशाने सध्या मुलाखती देताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प मागील काही काळापासून सातत्याने मुलाखती देत असून त्यांनी काही आठवड्यांपूर्वी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि एक्सचे (आधीचं ट्वीटर) प्रमुख एलॉन मस्क यांना मुलाखत दिली. खरं तर ट्रम्प हे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या लोकांना मुलाखती देत आहेत. नुकतीच त्यांनी पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅनला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा केली. अनेक वागद्रस्त आणि अगदीच वेगळ्या विषयांवर या मुलाखतीत ट्रम्प यांनी चर्चा केली. 

युएफओचा विषय

या मुलाखतीत बोलताना ट्रम्प आणि लेक्स यांचा उडत्या तबकड्या म्हणजेच युएफओसंदर्भात चर्चा झाली. युएफओ म्हणजेच परग्रहींची वाहनं म्हणून समजल्या जाणाऱ्या उडत्या तबकड्यांबद्दल अमेरिकेबरोबरच जगभरामध्ये कुतूहल कायमच राहिलं आहे. असं असतानाच आता अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या व्यक्तीने याबद्दल बोलल्याने पुन्हा या विषयाची चर्चा होताना दिसत आहे. भविष्यात अमेरिकेमधील संरक्षणदलाचं प्रमुख कार्यालय असलेल्या पेंटागॉनच्या माध्यमातून या उडत्या तबकड्यांचे व्हिडीओ सार्वजनिकरित्या जारी करण्याच्या धोरणाला माझा पाठिंबा असेल असं ट्रम्प म्हणाले.

नवे फुटेज जारी करणार?

पेंटागॉनला सांगून तुम्ही युएफओचे यापूर्वी न पाहिलेले आणि अधिक फुटेज जारी करायला सांगण्याची शक्यता आहे का? असं विचारलं. यावर उत्तर देताना ट्रम्प यांनी, "मी नक्कीच हे करेन. मला हे करायला आवडेल. खरं तर मला हे केलं पाहिजे," असं उत्तर दिलं. त्यामुळेच ट्रम्प सत्तेत आल्यानंतर यापूर्वी कधीही सर्वसामान्यांपर्यंत न पोहोचलेली रंजक माहिती समोर येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

सेक्स रॅकेटचा खुलासा करणार

ट्रम्प यांनी एकेकाळी ज्या सेक्स रॅकेटमुळे अमेरिका हादरुन गेलेली त्या प्रकरणामधील जेफरी पेस्टीनच्या संपर्कात कोण होतं याची यादीही जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. या विकृत व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर पाच वर्षानंतरही तो कायमच चर्चेचा विषय ठरतो. 

माजी राष्ट्राध्यक्षांच्या हत्येबद्दलही बोलले

ट्रम्प एवढ्यावरच न थांबता त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनडी यांच्या हत्येसंदर्भातही चर्चा केली. ट्रम्प यांनी केलेल्या या चर्चेमधून ते प्रसिद्ध ऑनलाइन व्यक्तीमत्वांबरोबर इतर नेते टाळत असलेल्या विषयांवरही बोलण्यास उत्सुक असल्याचं दिसून येत आहे.