Selfie Accident : धोकादायक ठिकाणी सेल्फी घेताना काळजी घ्यावी अशा सूचना वारंवार केल्या जातात. पण यानंतरही उत्साही तरुण-तरुणींकडून याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे सेल्फीच्या (Selfie) नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशाच एका दुर्देवी घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिआवर व्हायरल झाला आहे. सेल्फीच्या नादात एका महिलेला पती आणि मुलाच्या डोळ्यादेखत जीव गमवावा लागला. सोशल मीडियावर अपघाताचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मेक्सिकोतला असल्याचं सांगितलं जात आहे. (Empress train accident)
काय आहे नेमकी घटना?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एका रेल्वे ट्रॅकजवळ अनेक पर्यटक दिसत आहेत. यात अनेक महिला, पुरुष आणि लहान मुलं दिसतायत. रेल्वे ट्रॅकवरुन येणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी प्रत्येकाने आपला मोबाईल हातात धरलाय. ही लोकं अक्षरश ट्रॅकच्या जवळ असल्याचं दिसतंय. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मेक्सिकोत्या हिडाल्गो इथं वाफेची इंजन असलेली जुनी ट्रेन या मार्गावरुन धावते. या ट्रेनबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे ट्रेनचा फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी दररोज या ठिकाणी पर्यटक येत असतात.
या ट्रेनला 'एम्प्रेस' असं म्हटलं जातं. वाफेची इंजिन असलेल्या ट्रेनबरोबर फोटो घेण्याची पर्यटकांमध्ये उत्सुकता असते. घटनेच्या वेळीही या ट्रेनचा फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी जमलेली व्हिडिओत दिसतेय. याचवेळी एक महिलेला ट्रेनबरोबर सेल्फी घेण्याचा मोह झाला. मोबाईलचा कॅमेरा ऑन करत ती महिला ट्रॅकच्या अगदी जवळ जाते. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत ही महिला आपल्या लहान मुलाला जवळ घेऊन सेल्फी घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय.
महिलेचा जागीच मृत्यू
महिलेला सेल्फ घेण्याचा तयारीत असतानाच मागून वेगाने येणाऱ्या ट्रेनचा कोपरा महिलेच्या डोक्याला धडकतो आणि महिला जागेवरच कोसळते. अचानक घडलेल्या या घटनेने इतर पर्यटकांमध्ये खळबळ उडते. एक व्यक्ती त्या महिलेला ट्रेनपासून दूर खेचतो. पण त्या महिलेची कोणतीच हालचाल दिसत नाही. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार ट्रेनची धडक इतकी जोरदार होती की महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही महिला आपला मुलगा आणि त्याच्या शाळेतील इतर मुलांबरोबर हिडाल्गो या ठिकाणी आली होती. मुलांबरोबर या महिलेला जुन्या ट्रेनचा फोटो घ्यायचा होता.
MEXICO - In Hidalgo, a famous train that comes from Canada and travels all the way to Mexico City, attracting locals, struck a woman who was trying to take a selfie as the train approached. She passed at the scene. Article in comments. pic.twitter.com/32XdsCehEB
— The Many Faces of Death (@ManyFaces_Death) June 5, 2024
'एम्प्रेस' ही 1930 साली बनवण्यात आलेली वाफेच्या इंजीनची ट्रेन आहे. कॅनेडियन पॅसिफिक कॅनसस कंपनीने या घटनेवर एक निवेदन जाहीर कें असून घटनेवर दु:ख व्यक्त करत पोलिसांबरोबर तपासात सहकार्य करण्याचं जाहीर केलं आहे. तसंच लोकांनी रेल्वे ट्रॅकपासून किमान 10 मीटर दूर उभं राहावं असं आवानही केलं आहे.