नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
रशियाच्या निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, पुतीन यांनी ७६.६७ टक्के मते प्राप्त केली. निवडणूक आयोगाने म्हटले की देशाच्या निवडणुकांमध्ये दोन दशकांचा इतिहास विचारात घेता पुतीन यांची यंदाची कामगिरी सर्वश्रेष्ठ आहे. निवडणुक आयगाकडून एकूण मतांपैकी ९९.८ टक्के मतपत्रिकांची मोजणी केली.
दरम्यान, रशिया आणि पश्चिमी देशांमधले संबंध अत्यंत वाईट टप्प्यावर असताना रशियाच्या जनतेने पुतीन यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. निवडणुकीतील या विजयामुळे पुतीन यांना ६ वर्षांसाठी पुन्हा एकदा देशाचे राष्ट्रपती म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आता ते २०२४ पर्यंत या पदावर राहू शकणार आहेत.
दरम्यान, २०२४मध्ये पुतीन यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपेल तेव्हा, ते ७१ वर्षांचे असतील. रशियाच्या इतिहासात जोसेफ स्टालिन यांच्यानंतर इतकी वर्षे कार्यकाळ सांभाळणारा नेता म्हणूनही पुतीन यांच्याकडे पाहिले जात आहे.