मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं होतं. तिसरी लाट येणार असं म्हटलं जात होतं. पण ती इतक्यात आली नाही. पण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाचा हा नवा प्रकार हा किती घातक असू शकतो याची कल्पना अजून तरी कोणत्याच देशाला नाही. पण आधीच सावधगिरीचा उपाय म्हणून अनेक देशांनी उपाययोजना सुरु केल्या आहेत.
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भंयकर परिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांना आपला जीव या दरम्यान गमवावा लागला होता. त्यातच आता तिसरी लाट येणार की काय अशी परिस्थिती दिसत आहे.
जागतिक आरोग्य संघटना Omicron प्रकाराबद्दल लोकांना सतत इशारा देत आहे. पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओने या प्रकारावर माहिती देताना सांगितले की, कोरोनाव्हायरसचा नवीन प्रकार, ओमायक्रॉन, पूर्वी कधीही न पाहिलेल्यापेक्षा वेगाने पसरत आहे. जगभरात त्याची प्रकरणे अभूतपूर्व प्रमाणात वाढत आहेत. आतापर्यंत, 77 देशांमध्ये या प्रकाराची पुष्टी झालेली प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, हा प्रकार इतर अनेक देशांमध्ये देखील असण्याची शक्यता आहे. पण अनेक देशांमध्ये त्याचे रुग्ण आढळले नाहीत.
या प्रकाराचा सामना करण्यासाठी कमी प्रयत्नांवरही WHO ने चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, 'निश्चितपणे, आतापर्यंत या विषाणूला कमी लेखणे किती धोकादायक आहे हे आमच्या लक्षात आले आहे. ओमायक्रॉनमुळे सध्या किरकोळ लक्षणं दिस असले तरी त्याच्या वाढत्या केसेसमुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ शकतो. नोव्हेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन प्रकाराचा पहिला रुग्ण आढळला होता. जो आता 70 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.
डब्ल्यूएचओ तज्ज्ञ ब्रूस आयलवर्ड यांनी कडक इशारा देताना म्हटले आहे की, 'याला सौम्य आजार मानून निष्कर्षापर्यंत पोहोचू नये. असे करून आपण स्वतःसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहोत. डब्ल्यूएचओने सांगितले की ज्या ठिकाणी लसीकरणाचे दर कमी आहेत, आफ्रिकेसह अशा देशांमध्ये नवीन प्रकाराचा संसर्ग वाढण्याला अधिक संधी मिळेल. असा अंदाज आहे की मे 2022 पर्यंत, 40 टक्के लसीकरण आफ्रिकेत केले जाईल आणि ते 70 टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ऑगस्ट 2024 पर्यंतचा वेळ जाईल.
डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ सौम्या स्वामीनाथन म्हणतात की, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांचा मागोवा घेणे खूप महत्वाचे आहे. लस अजूनही गंभीर रोगापासून संरक्षण करते, म्हणून आपल्याला लसीकरण मोहिमेला गती द्यावी लागेल तसेच बूस्टरचा विचार सुरू करावा लागेल. याशिवाय, मास्क घालणे, वेंटिलेशनबाबत पुरतता करणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणणे महत्त्वाचे आहे, कारण पुढील काही महिने खूप कठीण जाणार आहेत.