भारताविरुद्ध युद्धाचा धोका चीन पत्करणार नाही, हे आहे कारण

संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार केल्यामुळे चीन मंदी आणि अंतर्गत मुद्द्यांमुळे अडचणीत सापडला आहे.

Updated: Jun 19, 2020, 03:54 PM IST
भारताविरुद्ध युद्धाचा धोका चीन पत्करणार नाही, हे आहे कारण

नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोनाचा प्रसार केल्यामुळे चीन मंदी आणि अंतर्गत मुद्द्यांमुळे अडचणीत सापडला आहे. तायवान आण हाँगकाँगने बंडाचं हत्यार उगारलं आहे. चीनला सर्वाधिक भीती लोकशाहीची वाटत आहे. त्यामुळे देशातल्या नागरिकांचं लक्ष हटवण्यासाठी चीनकडून युद्धाचं वातावरण तयार केलं जात आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आपल्या विस्तारवादी नितीमुळे चीनचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. अशा परिस्थितीमध्ये चीन युद्धाचा धोका पत्करणार नाही, असंही सांगितलं जात आहे. यासाठी काही कारणंही देण्यात आली आहेत.

सैन्य तैनाती

युद्धाच्या परिस्थितीमध्ये कोणत्याही देशाला त्यांच्या सैन्याला ताबडतोब मैदानात उतरवावं लागतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये चीन हे करण्याची शक्यता अत्यंत धूसर आहे. कारण चीन सध्या अनेक मोर्चांवर लढत आहे. चीनचं लष्कर, नौसेना आणि वायूदल सध्या व्यग्र आहेत. चीनची लढाऊ विमानं तायवानमध्ये घुसखोरी करण्यात व्यग्र आहेत. तायवानमध्ये चीन एकीकरणाची लढाई लढत आहे. तर दुसरीकडे चीनने दक्षिण चीन समुद्रातल्या बेटांवरचा दावा मजबूत करण्यासाठी जहाजं ठेवण्यात आली आहेत. 

पीपल्स लिब्रेशन आर्मी (PLA) कृत्रिम द्वीप बनवण्याचा अभ्यास करत आहे. चीनच्या जहाजांनी काहीच दिवसांपूर्वी जपानच्या जल सीमेमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे चीनचे जपानसोबतचे संबंधही खराब झाले आहेत. चीनने संबंध खराब केलेला जपान हा सातवा देश आहे. दुसरीकडे हाँगकाँगमध्येही लोकशाहीचे समर्थक आंदोलन करत आहेत. भारताविरुद्ध युद्ध करून हाँगकाँगमधून लक्ष हटवणं आणि विद्रोह होणं चीनला परवडणारं नाही.

अंतर्गत संघर्ष

चीनमध्ये आधीपासूनच अंतर्गत संघर्ष सुरू आहे. तिबेटमधला आपला दावा अजूनही वैध असल्याचं चीन वारंवार सांगत आहे. तर मंगोलियाचं पुन्हा एकीकरण व्हावं, यासाठी चीन आग्रही आहे. तर चीन सैनिक शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांवर खटले दाखल करत आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका असल्याचंही बोललं जात आहे. एवढी आव्हानं समोर असताना चीनचं लष्कर सीमेवर येऊ शकतं का? हा प्रश्न आहे.

आर्थिक परिस्थिती

एवढ्या आव्हानांनंतरही चीन जर लडाखमध्ये पोहोचायचा विचार जरी करत असेल, तरी त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ आहे का? २०२०च्या पहिल्या तिमाहीमध्ये चीनचा जीडीपी २०.६५ ट्रिलियन युआन (२.१९ ट्रिलियन डॉलर) आहे. चीनचा जीडीपी दरवर्षी ६.९ टक्क्यांनी कमी होत आहे. अन्य देशांसोबतचे संबंध खराब झाल्यामुळे अनेक उद्योग चीनमधून बाहेर पडत आहेत. याचा फटकाही चीनच्या जीडीपीला बसला आहे, यामुळे उत्पादन आणि मागणीही कमी झाली आहे. चीनच्या आयातीमध्येही ८.५ टक्क्यांची घट झाली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे चीनची अर्थव्यवस्था प्रभावित झाली आहे, याचा परिणाम लोकांच्या नोकरीवर झाला आहे, त्यामुळे संघर्षाचं वातावरण तयार झालं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये युद्ध करणं हा चीनपुढचा शेवटचा पर्याय असेल.