चारही बाजुंनी घेरला गेला चीन, अमेरिकेचीही आक्रमक भूमिका

वाचा चीन बाबत काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प?

Updated: Jun 19, 2020, 02:59 PM IST
चारही बाजुंनी घेरला गेला चीन, अमेरिकेचीही आक्रमक भूमिका title=

वॉशिंग्टन :   अमेरिकेचे (America) अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीन (China) बरोबरचे सगळ्या प्रकारचे व्यापार संबंध संपुष्टात आणण्याचे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी सांगितले की, चीनपासून पूर्णपणे वेगळं होण्याचा पर्याय अमेरिकेसाठी उपलब्ध आहे.

अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाइटहायजर यांनी एक दिवस आधी केलेल्या वक्तव्याचं खंडन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. लाइटहायजर म्हणाले होते की, जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांना वेगळं करणं शक्य नाही.

लाईटहायजर यांचे वक्तव्य खोडून काढणारे ट्वीट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले. ट्वीटमध्ये ट्रम्प म्हणाले, ही अँम्बेसिडर लाइटहायजर यांची चूक नव्हती. कदाचित मीही स्वतःला स्पष्ट केलं नव्हतं. पण चीनपासून पूर्णपणे वेगळं होण्यासाठी अमेरिकेकडे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये निश्चित धोरणाचा पर्याय उपलब्ध आहे.

ट्रम्प यांनी हे ट्वीट अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो आणि चीनचे अधिकारी यांग जिएची यांच्या मुलाखतीनंतर एक दिवसाने केले आहे. अशा संदिग्ध परिस्थितीत दोन्ही देशांत व्यापार करारावर समझोता नीती बनले का हा प्रश्न आहे. पोम्पेयो यांच्या म्हणण्यानुसार, यांग यांनी सांगितले की व्यापार करारानुसार चीन शेतमाल खरेदी करण्यासाठी कटिबद्ध आहे, जे ट्रम्प यांनी केलेल्या वाटाघाटींच्या समर्थनासाठी महत्वपूर्ण आहे.

दरम्यान, ट्रंम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी या वाटाघाटींबद्दल सांगितलं की, ट्रम्प यांनी चीनी अधिकाऱ्यांना सांगितले होते की अमेरिकेची कृषी उत्पादनं अधिकाधिक खरेदी करून त्यांनी ट्रम्प यांना पुन्हा एकदा निवडणूक जिंकण्यासाठी मदत करावी.