Why Chips Packets Are Filled With Air : एखाद्या दुकानातून समजा तुम्ही कधी वेफर्स किंवा फ्लेवर्ड चिप्स विकत घेतले, तर सर्वात आधी ते खुळखुळ्यासारखं हलवणारे अनेकजण तुम्ही पाहिले असतील. इतकंच काय, तर तुम्हीही असं किमान एकदातरी केलं असेल. वेफर्सची ही पाकिटं हलवून पाहिल्यानंतर आणि पुढे ते उघडल्यानंतर बऱ्याचजणांनी निराशा होते. का? अहो का काय विचारता, यामध्ये इतकी हवा असते की आपण पैसे हवेचे दिलेत की वेफर्सचे हेच कळत नाही.
मग सुरुवात होते ती म्हणजे वेफर्सची उत्पादनं विकणाऱ्या कंपनांना दोष देण्याची. पण, कधी ही हवा नेमकी का भरली जाते याचा विचार केलाय का? म्हणजे हवेत काही वेळ राहिले तर जे वेफर्स नरम पडतात तेच पाकिटातील हवेमध्ये कसे बरं कुरकुरीत राहतात?
(Chips Packet Gas) चिप्सच्या पाकिटांमध्ये असणारी हवा म्हणजे नायट्रोजन वायू. याच वायूमुळं पाकिटात असणारे चिप्स अधिक कुरकुरीत राहतात आणि दीर्घकाळ टीकतात. शिवाय त्यांची चवही टिकून राहते.
आहारतज्ज्ञांच्या मते ग्राहकांना ताज्या, संपूर्ण स्वरुपात असणाऱ्या (न तुटलेल्या) आणि कुरकुरीत पदार्थांचं सेवन करायचा आवडतात. थोडक्यात जर वेफर्सच्या पाकिटांमध्ये हवा भरली नाही, तर ते कुरकुरीत राहणार नाहीतच, शिवाय त्यांचा आकारही बिघडून जाईल. ग्राहकांची अशा उत्पादनांना मुळीच पसंती नसेल, त्यामुळं बऱ्याच कंपन्या नायट्रोजनचा वापर करतात.
(Chips Packet Air) वेफर्सच्या पाकिटांमध्ये हवा/ नायट्रोजन वायू भरणं त्या त्या कंपन्यांसाठी अत्यंत फायद्याचं असतं. इथं ग्राहकांच्या मानसितेचा मुद्दा लक्षात घेतला जातो. एखादी व्यक्ती कधीच अर्धवट तुटलेल्या, विचित्र अवस्थेत असलेल्या पदार्थाची चव घेणार नाही. शिवाय खाद्यपदार्थांची पाकिटं घेत असताना ते मोठ्या आकारालाही प्राधन्य देतात. त्यामुळंसुद्धा ही पाकिटं फुलवलेली असतात. असं न केल्यास कंपन्यांचं मोठं नुकसान होईल आणि त्यांच्या उत्पादनांची विक्रीसुद्धा होणार नाही.
काही गरजा आणि नाईलाज यातूनच वेफर्सच्या पाकिटांमध्ये नायट्रोजन वायूचा वापर केला जातो. आता तुम्हालाही हे कारण कळलंय ना? त्यामुळं आता पाकिटात किती हवा भरलीये.... असं म्हणून तक्रार करू नका.