Woman Murdered Someone Just Out Of Curiosity: कोरोनाकाळामध्ये मनोरंजन सृष्टीला आधार दिला तो ओटीटी (OTT) म्हणजेच ओव्हर द टॉप प्लॅटफॉर्म्सने. ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे मेन स्ट्रीम मनोरंजनाचं साधन म्हणून पहायला लागल्यापासून अनेक ट्रेण्ड बदलल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे चित्रपटांकडे पाहण्याच्या दृष्टीकोन यामुळे बदलला. मात्र त्याचबरोबर क्राइम शो आणि चित्रपटांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढल्याचं या ट्रेण्डमध्ये दिसून आलं आहे. क्राइम शोचा मोठा चाहता वर्ग मागील काही काळात तयार झाला असून अगदी माहितीपट म्हणजेच डॉक्युमेंट्रींपासून ते रहस्यमय स्टोरींपर्यंत अनेक गोष्टी या जेनरमध्ये आहेत. यामध्ये रहस्यकथांबरोबरच गुप्तहेरांच्या कथाही फारच आवडीने प्रेक्षकांनी स्वीकारल्या आणि डोक्यावर घेतल्या. मात्र क्राइम शोच्या या अती एक्सपोजरचे दुष्परिणामही दिसून येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
दक्षिण कोरियामधील पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. ही तरुणी क्राइम शो आणि रहस्यमय पुस्तकांची मोठी चाहती आहे. वारंवार क्राइम शो आणि तसाच कंटेट पाहून या मुलीने चक्क एका व्यक्तीची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. आपण उत्सुकतेपोटी ही हत्या केल्याचं या तरुणीने पोलिसांना दिलेल्या जबाबामध्ये म्हटलं आहे. या व्यक्तीला मारण्याचा इतर आपला कोणताही हेतू नव्हता. केवळ एखाद्या व्यक्तीची हत्या कशी केली जाते हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेपोटी माझ्या हातून ही हत्या झाली असं ही तरुणी म्हणाली आहे.
पोलिसांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जुंग यो जुंग असं अटक करण्यात आलेल्या 23 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तिला बुसान शहरामधून अटक करण्यात आली आहे. दक्षिण कोरियामधील 'चोसन इल्बो' या वृत्तपत्राने यासंदर्भातील माहिती दिली आहे. कोरिया टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी या तरुणीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक क्राइम टीव्ही शो आणि त्यावर आधारित पुस्तक वाचल्यानंतर या तरुणीने केवळ हत्या करण्याच्या उत्सुकेपोटी हा गुन्हा केला, असं पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या तरुणीने कोणाची हत्या केली हे मात्र पोलिसांनी जाहीर केलेलं नाही.
जुंग यो जुंगने नववीत शिकणाऱ्या आपल्या मुलीला खासगी शिकवणी देण्यासाठी गरज असल्याचं सांगत हत्या करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा शोध सुरु केला. पोलिसांनी या महिलेच्या मोबाईल सर्च रेकॉर्डमधून गोळा केलेल्या माहितीमध्ये तिने मृतदेह कसा लपवायचा याबद्दल माहिती शोधल्याचं स्पष्ट झालं आहे. या महिलेला क्राइम शो पाहण्याची सवय होती. त्यामधूनच तिने लायब्रेरीमध्ये मेंबरशिप घेऊन क्राइम थ्रीलर कादंबऱ्या वाचण्यास सुरुवात केली. एखाद्या व्यक्तीची हत्या कशी करावी हे समजून घेण्यासाठी ती वाचन करत होती. हत्या करण्यासाठी ही महिला अनेक महिने तयारी करत होती.
शिकवणी पुरवणाऱ्या एका मोबाईल अॅप्लिकेशनवरुन जुंग आपलं सावज शोधत होती. तिने चाकूने हल्ला करण्यासंदर्भातील सरावही केला होता. हत्येच्या दोन दिवसांआधी जुंगने एका शिक्षिकेला फोन करुन मुलीच्या खासगी शिकवणीसंदर्भात बोलण्यासाठी घरीच भेटूयात असं सांगत बैठक ठरवली. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी जुंगच या शिक्षिकेच्या घरी पोहोचली. तिने शालेय मुलीचा गणवेश परिधान केला होता जो तिने ऑनलाइन मागवला होता. शिकवणीसाठी मुलगी आल्याचं समजून या शिक्षिकेने दरवाजा उघडला असता जुंगने तिच्यावर चाकूने हल्ला केला.
या शिक्षिकेची हत्या केल्यानंतर जुंगने जवळच्या किराणा मालाच्या दुकानातून घर साफ करण्याचं सामना, कचऱ्याच्या पिशव्या आणल्या. तिने या शिक्षिकेच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते एका मोठ्या सूटकेसमध्ये भरले. नंतर ही सूटकेस जंगलात फेकून आली. यासाठी तिने ज्या टॅक्सीवाल्याकडे बुकींग केली होती त्यानेच पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी जुंगच्या घरावर धाड टाकली असता या शिक्षिकेच्या मृतदेहाचे उरलेले तुकडे तिच्या घरातील कचऱ्याच्या पिशवीत सापडले.
आधी आपला वाद झाल्याने आपण या शिक्षिकेची हत्या केल्याचा दावा जुंगने केला होता. मात्र नंतर तिने केवळ उत्सुकतेपोटी आपण ही हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. "जेव्हा हे सारं झालं तेव्हा माझं स्वत:वर नियंत्रण नव्हतं," असंही जुंगने पोलिसांना सांगितलं. तिचा जबाब आणि तिने सांगितलेला घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.