मुंबई : ब्रिटनमध्ये अखेर नवीन सरकार स्थापन होणार आहे. याबाबत जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. नवीन पंतप्रधान लिझ ट्रस (Liz Truss) यांनी त्यांचं कॅबिनेट जाहीर केले आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या सोबत त्यांची टक्कर होती. पण अखेर त्यांनी बाजी मारली आणि सनक यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण असं असलं तरी भारतीय वंशाच्या एका महिलेला या कॅबिनेटमध्ये मोठं मंत्रिपद मिळणार आहे.
ब्रिटिश सरकारमध्ये भारतीयांचा दबदबा पाहायला मिळणार आहे. भारतीय वंशाच्या महिलेला गृहमंत्रीपद (UK Home Secretary) दिले आहे.
सुएला ब्रेव्हरमन ( Suella Braverman) असे या 42 वर्षीय महिलेचे नाव असून त्या याआधी पंतप्रधानपदाच्या उमेदवारही राहिल्या आहेत. मात्र, सुरुवातीच्या टप्प्यातच त्या शर्यतीतून बाहेर पडल्या. सुएला यूकेमधील फेअरहॅममधून खासदार आहेत. ऋषी सुनक यांच्याविरोधात निवडणुकीत लिझ ट्रस यांना पाठिंबा दिल्याने त्यांना त्याचं बक्षीस मिळाल्याचं बोललं जात आहे.
सुएला यांनी यापूर्वी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अॅटर्नी जनरल म्हणून काम केले होते. नवीन सरकारचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच सुएला यांनी म्हटलं होतं की, लिझ पंतप्रधान होणार आहेत. ते या कामात आधीच माहिर आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनला अशा अनुभवी व्यक्तीची गरज आहे, जो सहा वर्षे अडचणीतून जात असलेल्या या देशाला स्थिरता देऊ शकेल. गृहमंत्रीपद मिळाल्याने आनंदी असलेल्या सुएला म्हणाल्या की, हे पद मिळाल्याने मला खूप सन्मान वाटतोय. आता मी गृहमंत्री म्हणून देशाची सेवा करेन. संधीसाठी लिझ ट्रसचे आभार.
बौद्ध धर्म स्वीकारलेल्या सुएलाने केंब्रिज विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली. यानंतर, 2018 मध्ये त्यांनी रॉयल ब्रेव्हरमॅनशी लग्न केले. त्यांनी गेल्या जुलैमध्ये एक व्हिडिओ लॉन्च केला होता, ज्यामध्ये सुएलाने तिच्या पालकांबद्दल सांगितले. ब्रिटन या देशाने त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक संधी दिल्या आहेत. सुएलाचे पालक तामिळनाडूमधून यूकेमध्ये स्थलांतरित झाले होते.