गावाकडे जाऊन लग्न करणाऱ्या महिलांना सरकारी तिजोरीतून मिळणार 5 लाखांचा आहेर;अट फक्त एकच

trending News : जगाच्या पाठीवर दर दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडताना दिसतात. याच सर्व घटनांमध्ये सध्या चर्चेत असणारं वृत्त आहे जपानमधून. इथं काय सुरुय माहितीये?   

सायली पाटील | Updated: Aug 30, 2024, 11:13 AM IST
गावाकडे जाऊन लग्न करणाऱ्या महिलांना सरकारी तिजोरीतून मिळणार 5 लाखांचा आहेर;अट फक्त एकच  title=
world news Japan Government Offers Financial Support To Single Woman Relocate From Tokyo For Marriage

Trending News : जागतिक स्तरावर अनेक देशांना अनेक अडचणी आणि आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागतो. या अडचणी या अमुत एका राष्ट्राशी संबंधित राजकीय आणि आर्थिक स्थितीसोबकतच सामाजिक स्थितीशीही निगडीत असतात.  अशाच एका समस्येवर सध्या सरकारनंच तोडगा काढत नागरिकांना प्रामुख्यानं अविवाहित महिलांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. 

इथं चर्चा होतेय जपानची. जपान हा देश सध्या काही अडचणींशी दोन हात करत असून, इथं उदभवललेली समस्या आणि त्यावर सरकारनं राबवलेल्या उपाययोजनेमुळं अनेकांच्या भुवया उंचावत आहेत. वृद्धांचा वाढता आकडा आणि त्यासोबतच ग्रामीण भागांमध्ये महिलांच्या लोकसंख्येत होणारी घट यामुळं जपान सरकारपुढं नवी समस्या उभी राहिली आहे. याच अडचणीवर तोडगा म्हणून जपानमध्ये अविवाहित, सिंगल महिलांना लग्न करण्यासाठी एक मोठी रक्कम देण्याची योजना खुद्द सरकारनं राबवली आहे. अट फक्त एकच, या महिलांनी टोक्योतून बाहेर पडत ग्रामीण भागात लग्न करावं. इथं ग्रामीण भागांमध्ये अविवाहित पुरुषांच्या तुलनेत अविवाहित महिलांची संख्या अतिशय कमी आहे. 

2020 च्या जनगणनेनुसार टोक्यो वगळता जपानच्या 47 पैकी 46 प्रांतांमध्ये 15 ते 49 वर्षे वयाच्या जवळपास 91 लाख अविवाहित, सिंगल महिला होत्या. याच वयोगटातील पुरुषांच्या तुलनेत म्हणजेच 1.11 कोटी पुरुषांच्या तुलनेत ही आकडेवारी साधाण 20 टक्क्यांनी कमी आहे. 

लग्न करा आणि पैसे कमवा... 

पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असणाऱ्या जपानमधील टोक्यो शहराकडे महिलांचा ओघ अधिक असण्यामागची कारणं म्हणजे इथं मिळणाऱ्या रोजगार संधी आणि बदलमारी जीवनशैली. इथं येणाऱ्या अनेक महिला शिक्षण किंवा कामानिमित्त येतात आणि परत मूळ गावी जातच नाहीत ही वस्तुस्थिती असल्यामुळं इथं स्त्री- पुरुषांच्या संख्येत समानता आढळून येत नाही. 

जपान टाईम्सच्या वृत्तानुसार सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात जाऊन लग्न करणाऱ्या महिलांसाठी सरकारकडून दिलं जाणारं अनुदान अर्थात रक्कम आणखी वाढवम्यास येणार असून, महिलांना शासनाकडून 7000 डॉलरपर्यंतचे म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास पाच लाखांहूनही अधिकची रक्कम दिली जाणार आहेत. अट फक्त एकच, गावाकडे जाऊन लग्न करायचं. 

सरकानंच सुरु केलंय डेटिंग अॅप 

घटती लोकसंख्या, मनुष्यबळाचा अभाव आणि या सर्व परिस्थितीचा अर्थव्यवस्थेवर थेट पडणारा परिणाम पाहता या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी मागील बऱ्याच काळापासून जपान सरकार सातत्यानं प्रयत्न करताना दिसत आहे. सरकारच्या याच प्रयत्नांअंतर्गत इथं दाम्पत्यांना अपत्यप्राप्तीनंतर आर्थिक प्रोत्साहन दिलं जात असून, त्यांना चाईल्डकेअर आणि तत्सम सुविधाही दिल्या जात आहेत. 

हेसुद्धा वाचा : चीनचा काही नेम नाही; कोट्यवधी रुपये खर्चून पृथ्वीवर आणणार चंद्राचा तुकडा, काय आहे मेगाप्लॅन?

 

जपानमध्ये सरकारच्याच वतीनं एक डेटिंग अॅप सुरू करण्यात आलं असून, इथं सिंगल नागरिकांना एकमेकांची भेट घडवून देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. टोक्योतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एखादी व्यक्ती लग्न करू इच्छिते आणि तरीही त्यांना जोडीदार मिळत नाही, अशा वेळी सरकार त्यांची मदत करतं. मागील काही काळापासून जपानमध्ये घटणारा जन्मदर राष्ट्रीय स्तरावर एक गंभीर संकटाच्या दृष्टीकोनातून पाहत इथं त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत संपूर्ण जगाचं लक्ष वेधत आहे.